भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला ‘गलगले निघाले’ हा सिनेमा २००८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेत्री केतकी थत्तेने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘आभाळमाया’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘शब्दांची रोजनिशी’ अशा विविध मालिका व नाटकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. केतकीने ‘गलगले निघाले’मधून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. पण, यादरम्यान ती एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. नुकत्याच ‘आरपार’मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकी थत्ते म्हणाली, “२००४ मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी एक मालिका सुद्धा करणार होते. पण, २००५ च्या डिसेंबरमध्ये मला माझ्या जीभेचे सेन्सेशन गेल्यासारखे वाटले. त्यावेळी माझी अक्कलदाढ खूप दुखत होती. त्यामुळे मला वाटलं दाढेमुळे त्रास होत असेल. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला जाणवलं की, माझा डाव्या बाजूचा माझा चेहरा काहीच हलत नव्हता.”

“मी सर्वात आधी दातांच्या डॉक्टरकडे गेले. त्यावेळी ते मला म्हणाले, हे दातांचं दुखणं दिसत नाहीये मग, त्यांनी मला एक वेगळा डॉक्टर सुचवला. त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, मला Bells’s Palsy हा गंभीर आजार झालाय. Bells’s Palsy मध्ये तुमच्या चेहऱ्याचा अर्धा भाग हा पूर्णपणे निकामी होतो. आता आजार झालाय हे समजलं पण, हे मला का झालंय याचं कारण मला समजलं नव्हतं. मी तेव्हा अगदी २१-२२ वर्षांची होते.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला काही वेळाने कानावर पुळ्या दिसू लागल्या. तेव्हा मला डॉक्टरांकडून समजलं की, मुळात मला नागीण झालीये आणि यामुळेच मला Bells’s Palsy आजार झालाय. यामुळे माझी नर्व्ह डॅमेज झालेली होती. नागीण बरी होण्यासाठी साधारण ३ महिने लागतात. त्यामुळे तणाव घेऊ नकोस, तू बरी होणारेस एवढं फक्त लक्षात ठेव असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मी फिजिओथेरपी सुरू केली. गोळ्यांमुळे माझं वजन देखील वाढलं. त्या ३ महिन्यात माझा डोळाही बंद होत नव्हता. चिकटपट्ट्या लावून मी डोळा बंद करून झोपायचे. माझ्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत नव्हतं, डोळ्यांमधल्या त्या ग्रंथीही बंद झाल्या होत्या. यादरम्यान, मला माझ्या आत्याच्या मिस्टरांनी एक ओंकार (ॐ) साधनेचा प्रकार सांगितला. आपल्या क्षेत्रातले बरेच लोक त्यांच्याकडे जायचे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तो कोर्स केला आणि कोणत्याही ड्रॉपशिवाय चौथ्या दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. या सगळ्यादरम्यान मला माझ्या जवळच्या लोकांनी खूप साथ दिली.”

“मला काही करून त्या आजारपणातून बरं व्हायचं होतं. अर्थात हा आजार झाल्यावर यातून कोणीही पूर्णपणे बरं होतं नाही, पण आपल्या प्रकृतीत आधीपेक्षा मला सुधारणा करायची होती. हळुहळू माझी प्रकृती काहीशी सुधारली. आजारपणानंतरही याच क्षेत्रात काम करायचं यावर मी ठाम होते. मग, त्यानंतर ‘दादाची गर्लफ्रेंड’ या नाटकात मी काम केलं. यानंतर मला अचानक मंगेश काकाचा फोन आला त्यांनी मला केदार शिंदे यांच्या ‘गलगले निघाले’ या सिनेमाबद्दल सांगितलं. या सिनेमात मला भरत जाधव यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण, ज्यादिवशी मला चित्रपट मिळाला त्यावेळी सुद्धा मी सर्वात आधी केदार सरांना माझ्या आजारपणाबद्दल सांगितलं, मला कोणालाही अंधारात ठेवायचं नव्हतं. कारण, कॅमेरा सुरू झाला की, सगळ्या गोष्टी टीमसमोर येतातच… मी आजारपणाबद्दल सांगित्यावर त्यांना सगळं मान्य होतं मग, मी ‘गलगले निघाले’मध्ये काम केलं. या सिनेमानंतर मी ‘काटकोन त्रिकोण’ नाटकात काम केलं.” असं केतकी थत्तेने यावेळी सांगितलं.