Gargi Phule : डोक्यावर तिरपी गांधी टोपी आणि धोतराचा सोगा हातात धरत भेदक नजरेनं बोलणं अशी अनोखी शैली असलेले अभिनेते म्हणजे निळू फुले. आजवर त्यांनी आपल्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी साकारलेला नायक असो वा खलनायक; आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण त्यांच्या या भूमिकांऐवजी फक्त ‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्य जास्त प्रचलित झालं. पण हे वाक्य म्हणजे निळू फुलेंची खरी ओळख नव्हे. खरंतर हे वाक्य निळू फुलेंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही.
निळू फुलेंच्या ‘बाई वाड्यावर या’ वाक्याबद्दल गार्गी फुलेंचं भाष्य
सोशल मीडियावर अनेक कंटेट क्रिएटर्सकडून निळू फुलेंच्या ‘बाई वाड्यावर या…’ या वाक्याचा चुकीच्या अर्थाने वापर केला जातो आणि याचबद्दल त्यांची मुलगी गार्गी फुले यांनी याआधी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. अशातच त्यांनी ‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्य बाबाच्या कोणत्याच चित्रपटात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गार्गी फुले यांनी नुकतीच ‘वास्तव कट्टा’ला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी निळू फुलेंच्या ‘बाई वाड्यावर या…’ या वाक्याबद्दल भाष्य केलं.
“बाई वाड्यावर या असं बाबांनी त्यांच्या एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही”
याबद्दल गार्गी फुले असं म्हणाल्या की, “बाई वाड्यावर या असं बाबाने त्यांच्या एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही. तुम्ही शोधून दाखवा. मी अनेकांना सांगते की, तुम्ही शोधून दाखवा. मीदेखील शोधते. अनेक चित्रपट बघितले; पण ‘बाई वाड्यावर या’ असं बाबा कोणत्याही चित्रपटात म्हटलेला नाही. मला त्याची हीच प्रतिमा मोडायची आहे. नवीन पिढीला जर निळू फुले कळायचे असतील, तर बाबाची फक्त ‘बाई वाड्यावर या’ ही प्रतिमाच नाही. त्याने समाजकार्य केलं आहे.अनेक वर्षं त्यासाठी त्याने लढा लढला आहे.””
“बाबाने अनेक वर्ष समाजकार्य केलं आहे आणि अनेक वर्ष तो लढला आहे”
यापुढे गार्गी फुले म्हणाल्या की, “चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी जो लढा उभा राहिला, तो मिथुन चक्रवर्ती आणि बाबा अशा काही लोकांनी केलेला आहे. तो लढा लोकांपर्यंत पोहोचतच नाही आणि तेव्हा आम्ही हे केलं असं सांगण्याची वृत्तीही नव्हती. त्यामुळे मला वाटतं हे सगळं लोकांना कळलं पाहिजे. म्हणूनच मी त्याच्यावर बायोपिचा विचार करत आहे. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की, निळूभाऊंवर बायोपिक करूया का? तर मला सुरुवातीला वाटलं की काय गरज आहे. बाबाला स्वत:लाच ते कधी आवडलं नसतं. “
“‘बाई वाड्यावर’ या हीच प्रतिमा नाही; तो खूप त्याच्यापरे आहे”
यापुढे गार्गी फुलेंनी सांगितलं की, “यामुळेच त्याने आत्मचचरित्र वगैरे लिहिलं नाही. त्यात खोटं लिहिणं मला जमणार नाही आणि जे खरं लिहीन ते लोकांना आवडणार नाही असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यापेक्षा न लिहिलेलं बरं. त्यामुळे मी आधी नको म्हणाले. पण नंतर मी विचार केला की, त्याची फक्त ‘बाई वाड्यावर’ या हीच प्रतिमा नाही. तो खूप त्याच्यापरे आहे. त्यामुळे लोकांना आणि नवीन पिढीला कळण्यासाठी मला हे केलं पाहिजे. म्हणून मी प्रसादला म्हटलं की, चल हे करुया.”