गेल्या काही दिवसांपासून ‘सुशीला सुजीत’ हा मराठी चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. प्रसाद ओक(Prasad Oak)दिग्दर्शित या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत होत्या. आता या चित्रपटाच्या म्युझिक लॉंचचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या सगळ्यात गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani) व अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) यांनी लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये गश्मीर महाजनी व अमृताची एक वेगळी झलक पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गश्मीर महाजनी व अमृता खानविलकर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. ‘सुशीला सुजीत’ चित्रपटातील ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या गाण्यावर गश्मीर व अमृताने डान्स केला आहे. त्यांच्या डान्सच्या स्टेप्स, वेशभूषा यामुळे या दोन्ही कलाकारांनी लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रसाद ओकने म्हटले, “सुटता सुटेना बंद दारामागची कोडी, भन्नाट स्वॅग घेऊन आलीये गश्मीर – अमृताची जोडी. ‘सुशीला – सुजीत’मधलं धमाकेदार गाणं ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ रिलीज झालंय, फक्त पॅनोरमा म्युझिक मराठीवर”, असे म्हणत हे गाणे पॅनोरमा म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनेवर प्रदर्शित झाल्याचे म्हटले आहे.

‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, नीलेश राठी यांनी केली आहे; तर चित्रपटाची कथा प्रसाद ओकने लिहिली आहे. याबरोबरच तो या चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

गश्मीर महाजनीबद्दल बोलायचे तर अभिनेता ‘फुलवंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्राजक्ता माळी या चित्रपटात त्याच्याबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर अभिनेता महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनेत्याने मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता अभिनेता ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमृता खानविलकरच्या कामाबाबत बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसली होती. अभिनयाबरोबरच अमृता खानविलकर तिच्या डान्ससाठीदेखील ओळखली जाते. दरम्यान, आता ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे, नक्की काय पाहायला मिळणार आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.