अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani) हा नुकताच ‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीबरोबर प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता पुन्हा एकदा अभिनेता लवकरच एका नवीन मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande)बरोबर गश्मीर महाजनी स्क्रीन शेअर करणार आहे. ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
‘या’ मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृण्मयी देशपांडे व गश्मीर महाजनी दिसत आहेत. शेवटच्या फ्रेममध्ये सुरभी भोसलेसुद्धा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रेम म्हणजे प्रेम असतं, राधा असो वा मीरा; सगळ्यांचं सेम असतं? या ओळी लिहिलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ‘अंतरीचा सूर हलकेच असा उमटला…’ अशी सुरुवात असलेले एक गाणे ऐकायला येत आहे. मृण्मयीने व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “एक राधा, त्याची अबोल प्रीत. एक मीरा, त्याचे श्यामल गीत. प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर, म्युझिकल लव्ह स्टोरी.” पुढे अभिनेत्रीने या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार आहेत, हेही लिहिले आहे. सुरभी भोसले, मेधा मांजरेकर, आरोह वेलणकर व संदीप पाठक हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अविनाशकुमार प्रभाकर अहाले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा किरण यज्ञोपवित यांनी लिहिली आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीर महाजनीनेदेखील अशीच पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
आता समोर आलेल्या व्हिडीओवरून हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट असल्याचे दिसत आहे. मात्र, चित्रपटाची नेमकी गोष्ट काय, मृण्मयी व गश्मीर कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार, त्यांची गोष्ट काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता गश्मीर व मृण्मयीला नव्या भूमिकांत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, मृण्मयी देशपांडे ही ‘मन फकिरा’, ‘मिस यू मिस्टर’, ‘फतेशिकस्त’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी’, ‘फर्जंद’ अशा चित्रपटांत अभिनय करताना दिसली आहे. अभिनयाबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसते. गश्मीरबाबत बोलायचे, तर ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’ याबरोबरच नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘फुलवंती’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी विशेष लक्ष वेधले. ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्याबरोबरच त्याने ‘इमली’सारख्या हिंदी मालिकेतदेखील काम केले आहे. आता मृण्मयी व गश्मीर या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.