ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता. ते त्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला निधनाबद्दल माहिती दिली.
रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. गश्मीरने मात्र यावर काहीच थेट भाष्य केलं नाही. नुकतंच त्याने सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गश्मीरने या एकूण प्रकरणावर प्रकाश टाकला. ज्या गोष्टी आजवर फक्त गश्मीरला ठाऊक होत्या त्याबद्दल त्याने या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.
आणखी वाचा : ‘बॉलिवूड संपलं’ म्हणणाऱ्यांना मिळालं चोख उत्तर; ऑगस्टमध्ये आलेल्या चार हिंदी चित्रपटांनी कमावले ‘इतके’ कोटी
रविंद्र महाजनी एकटे राहत होते, त्यांची काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती किंवा एखादा केअरटेकर त्यांच्या कुटुंबियांनी ठेवला नव्हता असे आरोप गश्मीर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आले होते. याला गश्मीरने आता उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “माझे वडील माझ्या ह्या राहत्या घरीसुद्धा राहून गेले. गेल्या २० ते २२ वर्षांत त्यांनी कधीच कोणाच्या बाईच्या हातचं किंवा इतर कोणाच्या हातचं जेवण जेवले नाहीत. हे कोणालाच ठाऊक नाही. त्यांना स्वतःच्या हातचं बनवूनच खायला आवडायचं आणि गेले २२ वर्षं ते हेच करायचे. ते कायम स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचे.”
पुढे गश्मीर म्हणाला, “त्यांच्या घरी एखादी कुणी केअरटेकर पाठवलीच तर ते तिला हाकलवून द्यायचे. या घरातसुद्धा त्यांची खोली ते स्वतः साफ करायचे, त्यांच्या खोलीत त्यांचा वैक्युम क्लीनर होता आणि त्यांना इतर कोणी त्यांची खोली साफ केलेली आवडायची नाही. रोजचं जीवन जगण्यात इतर कोणाची मदत घेणं त्यांना नामंजूर होतं. स्वतःची कामं स्वतः करायचा त्यांचा शिरस्ता होता. हीच त्यांची जगण्याची पद्धत होती.”
या मुलाखतीमध्ये गश्मीरने अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. शिवाय त्याला या सगळ्या प्रकरणामुळे झालेला त्रास आणि सोशल मीडियावरील लोकांच्या कॉमेंट यावारही गश्मीर मानमोकळेपणे भाष्य केलं आहे.