‘मराठीतील देखणा अभिनेता’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै २०२३ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं. रवींद्र महाजनी करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना एक अभिनेत्री त्यांच्यावर फिदा होती आणि ती पाठलाग करायची, असा किस्सा माधवी महाजनी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात सांगितला आहे.
माधवी महाजनींनी लिहिलंय, “रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्याच्यावर फिदा होती. ती माझ्या घरी फोन करायची. घरातला नोकर फोन घेत असे. त्याच्याकडून रवी कोणत्या शहरात शूटिंग करतोय याची माहिती घ्यायची. त्याप्रमाणे ती त्याच्या हॉटेलमध्ये जायची. हे रवीला कळले की तो मला फोन करायचा. ‘हिला कोणी सांगितलं मी इथे आहे म्हणून’? असं विचारायचा. मग म्हणायचा ‘आता मी काय करू? माझ्या रूममध्ये जाऊन बसली असणार ती’. कधी तो तिला टाळण्यात यशस्वी व्हायचा. कधी रुममध्ये गेल्यावर त्याला कळायचं, ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची.”
“एकदा मी ऑफिसला गेले होते आणि घरी सासूबाई होत्या. रवी मुंबईतच स्टुडिओमध्ये गेला होता. ही नटी अचानक घरी आली, तिनं आमच्या घरातील बार उघडला आणि हॉलमध्ये बसून पीत बसली. इतकी प्यायली की तिथेच लवंडली. मी ऑफिस सुटल्यावर घरी आले तर सासूबाईंनी मला ती कशी पसरलीय ते दाखवलं. थोड्या वेळानं रवीही आला. सासूबाई बाहेर असल्याने आम्ही तिला उठवून आत नेलं. ती रवीला म्हणाली, ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’. मला म्हणाली ‘आपण दोघीही याच्याबरोबर एकत्र राहू.’ शेवटी कसंबसं आम्ही तिला धरून गाडीत घातलं. ह.रा.महाजनी मार्गावर गाडी थोडी स्लो होताच तिने गाडीतून बाहेर उडी मारली आणि गाडीसमोर जाऊन झोपली. तिला रवीला सोडून जायचंच नव्हतं. मग पुन्हा आम्ही दोघांनी तिला उचलून कसंबसं गाडीत कोंबलं आणि माहीमला तिच्या आईकडे सोडलं, त्यानंतर मात्र ती कधी पुन्हा घरी आली नाही,” असा किस्सा माधवी यांनी पुस्तकात सांगितला आहे. पण ती अभिनेत्री कोण होती, याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही.
दरम्यान, रवींद्र महाजनी हे मराठीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. फक्त मराठीच नाही तर हिंदी व गुजराती सिनेमेही त्यांनी केले होते.