अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. ‘फुलवंती’ या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राजक्ता माळीबरोबर तो मुख्य भूमिकेत दिसला होता. आता तो लवकरच मृण्मयी देशपांडेबरोबर ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता एका मुलाखतीत गश्मीर महाजनीने आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती ही आई असते, असे वक्तव्य केले आहे.
“आई ही आई असते”
गश्मीर महाजनीने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत आईविषयी बोलताना गश्मीरने म्हटले, “प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती ही आई असते. माझी आई व माझा मुलगा घरी असेल आणि बाहेर गेलो की सांगतो की घरी दोन लहान मुलं आहेत. एक ७५ वर्षाचं व एक सहा वर्षाचं अशी दोन लहान मुले घरी आहेत. ५०-६० च्या पुढे गेलात ना की तुमच्या वयाचा उलट प्रवास सुरू होतो. हे मी माझ्या आईमध्ये पाहिलं. लहानपण पुन्हा येते. मी आणि माझी बायको आता अशा टप्प्यावर आहोत जसं लहान मुलाला जपायचं तसंच आईलासुद्धा जपायचं. दोघांना आम्ही समान पातळीवर मानतो.”
“आई ही आई असते. माझ्या मुलाबरोबर खेळताना मी गौरीला बघतो. एका क्षणाला प्रचंड कडाक्याचं भांडण झालेलं असतं. खूप ओरडलेली असते आणि मग मी कुठेतरी बाहेर जातो, काहीतरी काम करतो. १० मिनिटात परत येतो. मला असं वाटत असतं की त्याला बघूया, त्याचा मूड बरा आहे. तिचा मूड बरा आहे का? त्याला लागलं असेल, तो दुखावला गेला असेल, ती दुखावली गेली असेल आणि आतमध्ये जाऊन बघतो तर दोघे खिदळत असतात. एकमेकांच्या कुशीत गेलेले असतात. त्यामुळे असे भांडण वैगेरे फार क्षणिक असतात. पाच-दहा मिनिटांकरिता असतात. मला आश्चर्य वाटतं की अरे १० मिनिटांपूर्वी इतका आरडा-ओरडा, रडारड सुरू होती. भांडण सुरू होतं. पाच-दहा मिनिटं परत तिच्या कुशीत जाऊन परत त्यांचं खिदळणं सुरूय. प्रत्येकासाठी त्याची आई सर्वोत्तम असते. फार महत्वाची व्यक्ती असते. तुमच्या आयुष्यातील सर्वात जास्त, सर्वाधिक महत्वाची व्यक्ती ही आई असते”, असे म्हणत गश्मीर महाजनीने प्रत्येकासाठी त्याची आई सर्वोत्तम असते, असे म्हटले आहे.
दरम्यान, गश्मीर महाजनीच्या कामाबाबत बोलायचे, तर ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’ ‘फुलवंती’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी विशेष लक्ष वेधले. ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्याबरोबरच त्याने ‘इमली’सारख्या हिंदी मालिकेतदेखील काम केले आहे. आता मृण्मयी व गश्मीर एक राधा एक मीरा चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.