‘फुलवंती’ चित्रपटातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजेच गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani) होय. याबरोबरच लोकप्रिय टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’मधून तसेच ‘फुलवंती’मधील त्याच्या भूमिकेतून अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने पालकत्वाविषयी त्याचे मत मांडले आहे.
काय म्हणाला गश्मीर महाजनी?
अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, तुला मुलगा झाला तेव्हा तू किती वर्षांचा होतास? यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “मी त्यावेळी ३३ वर्षांचा असेन.” मुलगा झाल्यानंतर ती एक अधिकची जबाबदारी आली. या अनुभवाविषयी काय सांगशील? यावर बोलताना गश्मीर महाजनीने म्हटले, “मूल ही जबाबदारी मला वाटत नाही. मी खूप दिवसांनंतर शूट करून मुंबईला आलो की मी माझ्या मुलाला खेळायला घेऊन जातो. आम्ही चालतो, गप्पा मारतो. तो मला त्याच्या शाळेत काय झालं वैगेरे गोष्टी सांगत असतो. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो, ते एक आमचं समीकरण बनलं आहे आणि ते तयार करावं लागतं. दहा दिवसांनंतर मला त्याच्याबरोबर पाहिल्यानंतर बऱ्याच बायका म्हणतात की, आज तुमची ड्युटी आहे का? मी यावर फक्त हसतो, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. मला ती ड्युटी वाटत नाही. मला आशा आहे की त्याने ते ऐकलं नाहीये. त्याला जेव्हा ते कळायला लागेल तेव्हा कदाचित त्याला आठवणार नाही, पण त्याच्या अवचेतन मनात कुठेतरी हे राहील की माझ्या वडिलांकरिता ही ड्युटी होती.”
पुढे बोलताना गश्मीर महाजनीने म्हटले, “कोणाच्याही आई-वडिलांकरिता मुलाबरोबर फिरणं ही ड्युटी कशी असू शकेल? तुमच्यामुळे त्याचा फक्त जन्म झालेला आहे. जेवढी तुम्ही त्याला व्हॅल्यू अॅडीशन देताय, तेवढीच व्हॅल्यू अॅडीशन तो तुम्हाला प्रत्येक क्षणाला देतोय, याचा अंदाज तुम्हाला का येत नाही? त्यामुळे कायम मला वाटतं की, ज्यांचं लग्न झालंय आणि मुलाचा विचार करत आहेत तर जबाबदारी, ड्युटी या गोष्टी मूल होताना मनात येत असतील तर प्लीज तुम्ही त्या मुलाला जन्म देऊ नका; कारण कुठेतरी त्याच्यावर व तुमच्यावर भावनिक आघात होणार आहे.”
“तुम्ही जेव्हा एक नवीन आयुष्य तुमच्या आयुष्यात स्वीकारायला तयार आहात. तुम्हाला जेव्हा वाटेल की त्या आयुष्याचं आपल्या आयुष्यात आल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू अॅडीशन होणार आहे, तरच ते मूल होऊ द्या. कित्येक ओळखीचे लोक मला येऊन मला म्हणतात की, आता माझ्या मुलाला माझा नवरा बघतोय. आता मला एक तास सुट्टी आहे, मला जरासं बरं वाटतंय. तुमच्या मुलापासून दूर राहणं तुमच्यासाठी सुटकेची भावना आहे, म्हणजे तुम्ही आई-वडील म्हणून कैद आहात का? ती तुमची भावना नकळतपणे तुमच्या मुलापर्यंत पोहोचत असते. ती नकारात्मक भावना तुमची मुलगी किंवा मुलापर्यंत पोहोचत असते, आपल्याला कळत नाही”, असे म्हणत गश्मीरने मुलाबरोबर वेळ घालवणे ही जबाबदारी नसून ते एकत्र जगणं आहे. एकमेकांना पूरक राहणे, त्याला जी गरज असेल ती किती पुरवायची ती मी ठरवायचं. माझ्या काही गरजा तो पुरवतो, याची जाणीव ठेवायची आणि त्याकरिता कायम कृतज्ञ राहायचं. मला माझ्या मुलाबरोबर वेळ घालवण्यातून आनंद मिळतो, मी त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी वाट पाहतो असे म्हटले आहे. याचबरोबर मी अनेकदा त्याला माझ्या शूटिंगच्या सेटवर घेऊन गेलो आहे. मुलांबरोबर खूप मजा येते, असेही अभिनेत्याने म्हटले आहे.
हेही वाचा: रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “आयुष्यात माणूस…”
दरम्यान, ‘फुलवंती’च्या यशानंतर गश्मीर महाजनीला एका नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.