अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर चाहत्यांना प्रश्न विचारायची संधी देतो आणि त्याची उत्तरंही देत असतो. यात तो त्याच्या अभिनयापासून ते कुटुंबाबद्दल विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं देत असतो. आता गश्मीरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने त्याला पडत असलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे.
आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”
एक स्वप्न आहे.
ते रोज येतं.
कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं.
मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही.
मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला.
माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो.
तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं.
म्हातारं झालं आणि लाचार झालं, अशी स्टोरी गश्मीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
दरम्यान, गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्याने ब्रेक घेतला आहे. तो ऑक्टोबर महिन्यात कामाला पुन्हा सुरुवात करणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तो लवकरच नवा प्रवास सुरू करणार आहे, असं म्हणाला होता. गश्मीर चाहत्यांना पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.