मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे जितके त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या नवीन चित्रपटांमुळे, भूमिकांमुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. अभिनेता गश्मीर महाजनी( Gashmeer Mahajani) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विविध चित्रपटांतील भूमिकांमुळे चर्चेत आहे. ‘फुलवंती’मधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यातून गश्मीर महाजनी व अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या गाण्याने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. आता गश्मीरने अमृता खानविलकरचे कौतुक केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, हे जाणून घेऊयात.
अमृतानेदेखील असाच…
गश्मीर महाजनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रश्न-उत्तरे हा सेशन घेतला. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची गश्मीरने उत्तरे दिली आहेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या नवीन गाण्याचे कौतुक केले. अनेकांनी तो उत्तम अभिनेता असल्याचे म्हटले, तर काहींनी त्याला त्याच्या आगामी चित्रपटाविषयी विचारले. एका चाहत्याने ‘फौजदार’साठी कास्टिंग झाली का, अभिनेत्रीची निवड झाली का असेही विचारले. एका चाहत्याने अमृताचे तीन शब्दात कौतुक करण्यास सांगितले. त्यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “अमृतानेदेखील असाच प्रश्न विचारला होता. पण, मला सगळ्यांना हे सांगायचे आहे की अमृता मला आतापर्यंत भेटलेली सर्वोत्तम व्यक्ती आहे”, असे म्हणत अभिनेत्याने अमृता खानविलकरचे कौतुक केले आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटातील ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणे ३ मार्च २०२५ ला प्रदर्शित झाले. यामध्ये गश्मीर व अमृताचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. हा चित्रपट १८ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबच त्याने या चित्रपटाची कथादेखील लिहिली आहे. तसेच तो स्वप्नील जोशी, मंजिरी ओक यांच्याबरोबर निर्मातादेखील आहे.

दरम्यान, गश्मीरने काही मुलाखतीत ‘फौजदार’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी तो सध्या या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे म्हटले होते. आता चाहत्याने त्यासंबंधी प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. चाहत्याने म्हटले की, ‘फौजदार’साठी अभिनेत्रीची निवड झाली का? यावर बोलताना गश्मीर महाजनीने नाही असे म्हटले आहे. आता गश्मीर आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.