दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब या दुःखातून सावरत आहे. वडिलांच्या निधनानंतर मौन असलेल्या गश्मीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी वडिलांबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर गश्मीरने दिलेल्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे.
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीची अशी आहे अवस्था; गश्मीर म्हणाला, “माझ्या आईची…”
एका चाहत्याने गश्मीरला बाबांबद्दल विचारलं. “तुला तुझ्या वडिलांना काय सांगावसं वाटतंय?”, असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी १३ दिवसांत त्यांना सांगायचं होतं ते सांगितलं आहे. त्याबद्दल तुम्ही जाणून घ्यायची गरज नाही.”
यावेळी गश्मीरने लवकरच शुटिंग सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या कुटुंबाला त्याची गरज आहे, खासकरून आईला. त्यामुळे त्याने मालिकांचं शुटिंग थांबवलं आहे. आईची प्रकृती ठिक झाल्यानंतर कामावर पुन्हा रुजू होणार असल्याचं गश्मीरने म्हटलं आहे. यावेळी त्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं तसेच या कठीण प्रसंगात ज्या मित्रांनी मदत केली, त्यांना कधीच विसरू शकणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल मुलगा गश्मीरला पोलिसांनी फोन करून सांगितलं होतं. ते फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर गश्मीवर अनेकांनी टीका केली होती. एवढा मोठा अभिनेता असून त्याला वडिलांच्या निधनाची माहिती नव्हती, असं म्हणत त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर गश्मीरने पोस्ट करून उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता त्याला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली.