Gashmeer Mahajani On his Marathi superhit film: लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी नुकताच ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाच्या ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या गाण्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या गाण्यात त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील दिसली होती.
गश्मीर महाजनी काय म्हणाला?
अभिनेता मराठीसह हिंदी मालिका, वेब सीरिज, रिअॅलिटी शोमधूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो. देऊळ बंद या चित्रपटातून अभिनेत्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आणि त्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात मोहन जोशी, निवेदिता सराफ, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर असे अनेक दिग्गज कलाकार दिसले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत गश्मीर महाजनीने मोठा खुलासा केला आहे.
गश्मीर महाजनीने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत गश्मीर म्हणाला की ‘देऊळ बंद’ सिनेमाच्या वेळीच दुसऱ्या सिनेमाची कथा लिहिली गेली होती. हा सिनेमा शेतकऱ्यांच्या विषयावर असल्यामुळे त्यात राघव शास्त्री हा नासाचा वैज्ञानिक फिट बसत नाही. म्हणून मी सिनेमात दिसणार नाही. मात्र, पहिल्या भागात दिसलेले इतर कलाकार दुसऱ्या भागातही दिसणार आहेत.
देऊळ बंद हा चित्रपट २०१५ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सिनेमात गश्मीरने नासाचा वैज्ञानिक राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता नुकतीच ‘देऊळ बंद २’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
दरम्यान, गश्मीर महाजनी ‘फुलवंती’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. प्राजक्ता माळी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यानंतर मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले या अभिनेत्रींबरोबर एक राधा एक मीरा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. तसेच इमली या हिंदी मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शो मध्येदेखील सहभागी झाला होता. या शोमध्ये तो फर्स्ट रनरअप ठरला.