दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. १५ जुलै रोजी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत बोललं गेलं. रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी माधवी महाजनी आहेत. रवींद्र व माधवी यांना मुलगी रश्मी व मुलगा गश्मीर ही दोन अपत्ये आहेत. गश्मीर हा प्रसिद्ध अभिनेता आहे, तर रश्मी अभिनयक्षेत्राच्या झगमगाटापासून दूर आहे.
रवींद्र महाजनी व माधवी यांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज याबद्दल त्यांचा मुलगा गश्मीरने सांगितलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ‘ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाबद्दल विचारलं. “तुमच्या आईवडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज? मधू मॅडमसारख्या इतक्या चांगल्या व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या याबद्दल जाणून घ्यायला आवडेल,” असं एका चाहत्याने गश्मीरला विचारलं.
त्यावर गश्मीर म्हणाला, “दोघांचं लव्ह मॅरेज होतं. पण दुर्दैवाने अगदी मनापासून प्रेम फक्त तिनेच केलं.” दरम्यान, माधवी महाजनी यांचा मराठीतील सर्वात देखणे अभिनेते अशी ओळख असलेल्या रवींद्र महाजनींशी विवाह झाला होता, पण त्या या इंडस्ट्रीच्या लाइमलाइटपासून दूर होत्या. गश्मीरने ‘झलक दिखला जा’ मध्ये भाग घेतला होता, तेव्हा फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये माधवी महाजनी आल्या होत्या.
रवींद्र महाजनींचा मुलगा गश्मीर अभिनेता झाला. तर त्याची बहीण रश्मी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी असून तिचं लग्न झालं आहे. गश्मीरचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव गौरी आहे. या दोघांना एक मुलगादेखील आहे. गश्मीर आई, पत्नी व मुलासह मुंबईत राहतो, तर त्याचे दिवंगत वडील पुण्यात राहायचे.