ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता. ते त्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला निधनाबद्दल माहिती दिली.
रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. गश्मीरने मात्र यावर काहीच थेट भाष्य केलं नाही. नुकतंच त्याने सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गश्मीरने या एकूण प्रकरणावर प्रकाश टाकला. ज्या गोष्टी आजवर फक्त गश्मीरला ठाऊक होत्या त्याबद्दल त्याने या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “माझा नंबर त्यांनी ब्लॉक केला कारण…” वडीलांच्या वागणुकीबद्दल गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा
एवढे मोठे दिग्गज कलावंत असूनही त्यांना एकटे राहत असताना सिक्युरिटीची काहीच गरज नव्हती का? असाही प्रश्न त्यांच्या मृत्यूनंतर नेटकऱ्यांनी केला. या मुलाखतीमध्ये गश्मीरने याचंही उत्तर दिलं आहे. गश्मीर म्हणाला, “तुम्हाला माहितीच आहे की माझ्या वडिलांचं व्यक्तिमत्व हे देखणं आणि रांगडं असं होतं. जर त्यांच्या सिक्युरिटीसाठी आम्ही कुणी माणूस नेमला असता तर त्याला त्यांनी मुस्कटात मारून परत पाठवलं असतं. त्यांना काही गरज नव्हती सुरक्षेची, ते अत्यंत खंबीर होते. त्यांच्याजवळ कायम परवाना असलेली आणि भरलेली बंदुक असायची, जी आम्हाला पोलिसांनी दिली. आता ती मी पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. ते असेच होते आणि ही त्यांची जगायची पद्धत होती. ते कायम एका स्टारप्रमाणे जगले.”
रविंद्र महाजनी एकटे राहत होते, त्यांची काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती किंवा एखादा केअरटेकर त्यांच्या कुटुंबियांनी ठेवला नव्हता असे आरोप गश्मीर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आले होते. या आरोपांचं गश्मीरने खंडन केलं. या मुलाखतीमध्ये गश्मीरने अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. शिवाय त्याला या सगळ्या प्रकरणामुळे झालेला त्रास आणि सोशल मीडियावरील लोकांच्या कॉमेंट यावारही गश्मीर मानमोकळेपणे भाष्य केलं आहे.