ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी ‘चौथा अंक’ नावाने आपलं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात माधवी यांनी त्यांचं बालपण, रवींद्र महाजनींशी विवाह, मुलगा रश्मी व गश्मीर यांना मोठं करताना आलेल्या अडचणी, रवींद्र यांचा स्वभाव अशा बऱ्याच गोष्टींबद्दल लिहिलं आहे. त्यांच्या या पुस्तकात अभिनेता गश्मीर महाजनीने बालपणीची एक आठवण सांगितली आहे. ज्यात रवींद्र महाजनींनी माधवी यांना मारहाण केल्याचा उल्लेख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गश्मीरने लिहिलं, “बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसांच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपवून १० वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रुममधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलं. कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, ‘गशू, पोलिसांना फोन लाव रे’. यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली, बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्याजागी भोकाड पसरलं. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि ‘काही नाही झालं तुझ्या आईला’, असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक.”

हेही वाचा – “आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास अन्…”, गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे ‘असे’ मिळालेले संकेत; म्हणाला…

पुढे गश्मीरने वडिलांच्या जुगाराच्या सवयी, आईने घेतलेला लग्नाचा निर्णय व त्याचे झालेले परिणाम याचा उल्लेख केला. “वी आर अॅज गूड अॅज द चॉइसेस वी मेक. भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हेदेखील आपल्या निश्चितपणे माहित असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) माहित होते, बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होती हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहित होते. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहित होतं,” असं त्याने लिहिलंय.

हेही वाचा – “त्यांचं निधन…”, रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच त्यांच्या पत्नीचे विधान; गश्मीर महाजनीच्या उपस्थितीत आत्मचरित्र प्रकाशित

“असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पण खरं तर आपण इतिहासातून नीट शिकत नाही आणि म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाइप म्हणजेच मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या-छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करतोय, तुम्हीही करा,” असं गश्मीर महाजनीने पुस्तकात त्याच्या बालपणीच्या आठवणीत लिहिलंय.