मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झालं. १५ जुलैला पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला होता. या घटनेनंतर आज जवळपास ६ महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. ‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी यांनी आयुष्यातील चढ-उतार, चांगल्या-वाईट आठवणी लिहित भावनांना वाट मोकळी करून दिल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रवींद्र व माधवी महाजनी यांचा लेक तसेच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता गश्मीर देखील उपस्थित होता. यावेळी वडिलांच्या निधनादरम्यान घरात घडलेला एक प्रसंग त्याने प्रस्तावनेस्वरुपात सर्वांना वाचून दाखवला.

गश्मीर म्हणाला, “पुस्तकाचं नाव काय ठेवायचं याबद्दल आम्ही सगळेजण खूप विचार करत होतो. एकदा आई जुन्या कलाकारांचा किस्सा सांगत असताना ‘चौथा अंक’ असा उल्लेख तिने उल्लेख केला. त्यानंतर खूप विचार करून आम्ही हे नाव अंतिम केलं. ‘चौथा अंक’ हे नाव ठेवलं कारण, १२ जुलै २०२३ रोजी मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येत होता. कदाचित तो वास धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा असं मला वाटलं पण, तो वास कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना? म्हणून मी आणि माझ्या बायकोने संपूर्ण वार्डरोब हुडकून काढला. पण, काहीच सापडलं नाही.”

हेही वाचा : “मी भयंकर दडपणात असताना विजय सेतुपतींनी…”, सई ताम्हणकरने सांगितला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील किस्सा; म्हणाली…

गश्मीर पुढे सांगतो, “त्याच दुपारी मी, माझी पत्नी, आई व चार वर्षांचा व्योम आम्ही एकत्र जेवलो. मी आणि व्योम एकमेकांची चेष्टा करत होतो. भाजी, भाकरी, वरण असं सात्विक जेवण बनवलं होतं. जेवणानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. त्याच्या महिनाभर आधी आई शुगर लो होऊन पडली होती. तिच्या डाव्या हाताची तर्जनी खूप सुजली होती. शेवटी मी तिला मुंबईत घेऊन आलो अन् महिनाभरात ती ठणठणीत बरी झाली. तिची औषधं सुरू होती, सगळी पथ्य योग्यरित्या ती फॉलो करत होती. त्यामुळे अचानक उलट्या सुरू होण्याचं नेमकं कारण काय? हेच मला समजत नव्हतं. रात्री मी आमच्या व्योमला पाहायला बेडरुममध्ये गेलो तेव्हा सुद्धा तोच कुजका वास मला येत होता.”

हेही वाचा : “त्यांचं निधन…”, रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच त्यांच्या पत्नीचे विधान; गश्मीर महाजनीच्या उपस्थितीत आत्मचरित्र प्रकाशित

“दुसऱ्या दिवशी मी आईला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. तिच्या उलट्या कमी झाल्या होत्या पण, पोटातील आतड्या पार पिळवटून निघाल्या होत्या. तिची अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले होते. आईला घरी सोडलं आणि मी घाईत आवरून एका मिटींगसाठी निघालो. मी गौरीला घरातील वासाबद्दल सांगितलं, तेव्हा मला असं लक्षात आलं की, तो कुजकट वास फक्त मलाच येत होता. त्याच संध्याकाळी मला तळेगावातील सोसायटीमधून मला फोन आला. घर मालकीण म्हणाली, “बाबा घराचं दार उघडत नाहीत.” मी माझ्या पुण्यातील दोन मित्रांना तिकडे पाठवलं. तासाभरात मित्राने फोन करून सांगितलं, “गश्मीर लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतोय.” मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्यांचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्या शाप देत त्यांच्या अवतीभवती घुटमळत असेल का? पण, बाबांचा आत्मा आम्हाला नक्कीच संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, वॉर्डरोबमधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांची पत्नी व मुलाला सांगत होता… बाबांनो! माझ्या आयुष्यातील ‘चौथा अंक’ आता संपलाय. आता या आणि मला घेऊन जा. बाबा नाटकाचे प्रयोग संपल्यावर चला आता नाटकाचे तीन अंक संपले…आता चौथा सुरु असं म्हणायचे. त्यामुळेच माझ्या आईने तिच्या आयुष्यातील हा ‘चौथा अंक’ या पुस्तकाच्या स्वरुपात तुम्हा सर्वांसमोर मांडला आहे.” असं गश्मीरने पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani shares incident during his father ravindra mahajani death at book launch of chautha ank sva 00