मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या ही तीन मुलं आहेत. तर अभिनेत्री गौरी इंगावले ही त्यांची मानसकन्या आहे. गौरीने तिच्या अभिनय व नृत्यकौशल्याने सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. गौरीने तिच्या खऱ्या आई-वडिलांसह त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘कुटुंब’, ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का-२’, ‘पांघरूण’ अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक झालं. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. गौरीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. गौरीही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करताना दिसते. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्या नवीन घराबद्दल माहिती दिली.
आणखी वाचा : महेश मांजरेकरांच्या लेकाने त्याच्या आईसाठी केली खास पोस्ट; म्हणाला…
गौरीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती तिच्या आई-वडिलांबरोबर नवीन घरामध्ये गृहप्रवेश करताना दिसत आहे. तर त्यांनी या घराचं वास्तुपूजनही केलं. या वेळी गौरीने पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. तिने तिचे आई-वडील व नातेवाईक यांच्याबरोबर या नवीन घराची पूजा करतानाचे खास क्षण व्हिडीओच्या मार्फत चाहत्यांशी शेअर केले. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने घर आणि रेड हार्ट असे दोन इमोजी कॅप्शन म्हणून दिले.
आता गौरीने पोस्ट केलेला हा नवीन व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. तर या व्हिडीओवर कमेंट करत तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी त्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत.