गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतमीच्या डान्सवर अनेकांनी आक्षेपही घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री व भाजपा नेत्या प्रिया बेर्डे यांनीही गौतमीच्या कार्यक्रमावर टीका केली होती.
गौतमी पाटीलच्या डान्सबाबत प्रिया बेर्डेंनी प्रतिक्रिया दिली होती. “या सगळ्या गोष्टींना बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोक आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही कलाकारांनी किंवा राज्यकर्त्यांनी ओरडून कितीही निषेध केला तरी काही उपयोग होणार नाही. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. लोक जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार,” असं प्रिया बेर्डै म्हणाल्या होत्या.
प्रिया बेर्डेंच्या या वक्तव्यावर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गौतमीने याबाबत भाष्य केलं. प्रिया बेर्डेंच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारताच गौतमी म्हणाली, “मी वाईट काय करतेय हे त्यांनी दाखवावं.”
हेही वाचा>> “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले, “मला…”
दरम्यान, डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली गौतमी पाटील मराठी चित्रपटात झळकणार आहे. ‘घुंगरू’ असं चित्रपटाचं नाव असून यात गौतमी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.