गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील होय. तिच्या डान्समध्ये लावणी कमी आणि अश्लीलपणा जास्त असतो, असा आरोप तिच्यावर झाला. त्यानंतर तिला अनेक राजकीय नेत्यांकडून व लोकांकडून रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर तिने माफीही मागितली होती. अलीकडेच गौतमीचा साताऱ्यात कार्यक्रम झाला. यावेळी तिने आपण चुका सुधारत असल्याचं सांगितलं.
महालक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या एका महिला अधिकाऱ्याने गौतमी पाटीलविरोधात सातारा न्यायालयात तक्रार दिली होती. अश्लीलतेचा ठपका ठेवत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी तक्रार न नोंदवून घेतल्याने त्यांनी कोर्टात तक्रार दिली. याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं गौतमी पाटील म्हणाली. यावेळी तिने त्या तक्रारकर्त्या महिलेपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना गौतमी म्हणाली, “मी त्या ताईंना इतकंच म्हणेन की मला कुणालाही वाईट म्हणायचं नाहीये. मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की ताई, मी ती चूक केली होती, पण आता मी ती चूक करत नाही. माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. तुम्ही एकदा माझा डान्स बघा आणि नंतर पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. पण अश्लीलपणा मी कधीच सोडला आहे. आपल्याच लोकांनी मी चुकत असल्याची जाणीव करून दिली आणि त्यानंतर मी सुधारणा केली आहे. मी तीच चूक आणि अश्लीलपणा करत नाहीये.”
“पाकिस्तानला घरात घुसून मारलं” कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर म्हणाले, “मी तिला फार…”
यावेळी गौतमीने तिचा चित्रपट आणि दोन-तीन गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली.