जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांना रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे लक्ष दिलं. अभिनेत्रीला मराठी संस्कृतीची उत्तम जाण असून तिला आता महाराष्ट्राची सून म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा : Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसने नातवाबरोबर ‘अशी’ साजरी केली दिवाळी पहाट; पाहा व्हिडीओ
मराठी परंपरा, संस्कृती व सण जिनिलीया उत्तमरित्या साजरे करते. प्रत्येक सणाला रितेश-जिनिलीया नवनव्या उपक्रमांचं आयोजन करत त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. यावर्षी गणपतीत त्यांच्या मुलांनी बाप्पाची विशेष मूर्ती साकारली होती यावेळी देशमुख कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. आता जिनिलीयाने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये देशमुखांच्या घरच्या दिवाळीची झलक पाहायला मिळत आहे. आज दिवाळीनिमित्त जिनिलीयाने दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घातलं होतं.
जिनिलीया या व्हिडीओमध्ये रियान आणि राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल व उटणं लावून स्नान करणे. दरवर्षी दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केलं जातं.
जिनिलीयाने आपल्या दोन्ही लेकांना अभ्यंगस्नान घातल्याचा व्हिडीओ शेअर करत सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, रितेश-जिनिलीया ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. रितेशने अलीकडेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात झळकली होती.