अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखचा वेड हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवायला सुरुवात केली. नुकतंच जिनिलीयाने सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दल खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलीयाने देशमुख ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतून १० वर्षे ब्रेक घेण्यामागचे कारण सांगितले आहे. यावेळी ती म्हणाली, “मी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला कारण मला माझ्यासाठी ते करायचे होते. मला माझे कुटुंब सुरु करायचे होते.”
आणखी वाचा : “मी स्वत:ला सहन करू शकत नाही…” अभिजित पानसेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“त्यावेळी मला चित्रपटात अभिनय करण्याचा आणि इतर गोष्टी करण्याबद्दल पुरेसा आत्मविश्वास नव्हता. हा निर्णय मी घेतला होता आणि मला त्याचा आनंद आहे. मी घेतलेल्या निर्णयाचा मला पूर्ण आदर आहे. पण आज मला असं वाटतंय की, मी खऱ्या आयुष्यात गृहिणी, पत्नी आणि आईची भूमिका साकारली आहे. त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आहे.

“माझ्याकडे एक प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि इतर उपक्रम आहेत. या पैलूंचा विकास झाला कारण मला त्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला. मी अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी करु शकते याची खात्री पटली. पण या काळात मला अभिनयाची उणीव भासली.” असेही जिनिलीयाने सांगितले.

“जर रितेश नसता तर मी आणखी ब्रेक घेतला असता. त्यानेच मला सांगितले होते की, तू तुझ्या कलाकुसरीचा आनंद घेत आहेस, पण आता त्याकडे परत जाण्याची वेळ आली आहे. मी आता सिनेसृष्टीत परतली आहे. मला कोणतेही प्रोजेक्ट निवडण्याची घाई नाही. मला आता जे काही करायचे आहे, त्यासाठी थांबायला माझी काहीही हरकत नाही”, असे जिनिलीयाने म्हटले.

आणखी वाचा : “जेव्हा प्रसाद ओक…” मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अमृता खानविलकरचे थेट उत्तर

दरम्यान रितेश देशमुखचं दिग्दर्शन आणि जिनिलीया देशमुखची निर्मिती असलेला ‘वेड’ या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार कमाई केली आहे. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. यातील तिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh talk about why she took 10 year break from cinema industry said its because husband riteish deshmukh nrp