हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिरयानी’ हा मराठी चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. वेगळ्या विषयाची हटके मांडणी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील गाणी आणि टीझरपासूनच प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिली होती. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाचं कौतुक होत आहे.
नुकतंच चित्रपटातील मुख्य कलाकार आणि निर्माते नागराज मंजुळे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान नागराज यांनी चित्रपटाविषयी धमाल गप्पा मारल्या. इतकंच नव्हे तर या मुलाखतीदरम्यान नागराज यांनी सुरुवातीला ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट करण्यास नकार दिला असल्याचंही स्पष्ट केलं.
आणखी वाचा : “माझ्या वडिलांची प्रतिष्ठा…” मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाचे ‘गुंडा’ चित्रपटाबद्दल मोठे वक्तव्य
हा चित्रपट सुरुवातीला आकाश ठोसरसाठी करायचा असं नागराज यांच्या डोक्यात होतं. त्याविषयी बोलताना नागराज म्हणाले, “हा चित्रपट सुरुवातीला आकाशसाठी आला होता, त्यात यात रोल द्यायचा होता. हा चित्रपटच करायची माझी इच्छा नव्हती. मी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हाच ती मला अपूर्ण वाटली होती. संकल्पना फारच उत्तम होती, पण ती पूर्ण वाटत नव्हती. माझा धाकटा भाऊ आणि हेमंत यांनी मला ही कथा पुन्हा ऐकण्यासाठी विनंती केली. मग मी आणि हेमंत आम्ही दोघांनी मिळून याचं लिखाण सुरू केलं आणि मग इतर पात्रं आमच्या नजरेसमोर येऊ लागली.”
पुढे नागराज म्हणाला, “हा चित्रपट स्वतंत्रपणे माझ्या डोक्यात आला नसता, मला ही कथा सुचलीच नसती. पण असे चित्रपट व्हायला पाहिजेत असं मला वाटतं.” सध्या बॉक्स ऑफिसवर ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणतो आहे. यात नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.