‘सैराट’, नाळ, ‘फँड्री’, ‘झुंड’सारखे आशयघन चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. झी स्टुडिओज’ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा त्यांचा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त चित्रपटातील कलाकार आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि निर्माते मंगेश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यावेळी मनमोकळा संवाद साधला.
या मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से, शिवाय इतरही बऱ्याच गोष्टींवर नागराज मंजुळे यांनी संवाद साधला. नागराज त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर भाष्य करत असतात तर भविष्यात या समाजात बदल घडवण्यासाठी पुढेमागे राजकारणात यायची संधी मिळाली तर ते या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत की नाहीत? या प्रश्नाचं नागराज त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
आणखी वाचा : तृतीयपंथीयांची खिल्ली उडवणाऱ्याला सेलिना जेटलीने सुनावले खडेबोल; म्हणाली, “तुमच्यासारखे लोक…”
याबद्दल बोलताना नागराज म्हणाले, “हे जरा अतीच झालं म्हणजे स्वतःच बोलिंग टाकायची, स्वतःच बॅटिंग करायची, स्वतःच तो बॉल अडवायचा आणि प्रेक्षक म्हणून स्वतःच चीयर पण करायचं. समस्या सोडवायला मीच जायचं हे जरा अवघड काम आहे. मी एक कलाकार आहे, आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी जो संयम हवा तो माझ्यात नाही, मी अत्यंत साधा सरळ माणूस आहे. साधा म्हणजे अगदी भोळा या अर्थाने नाही.”
राजकारण या क्षेत्राविषयी बोलताना नागराज पुढे म्हणाले, “राजकारणात काम करणं अवघड काम आहे, ते वाईट काम अजिबात नाही. त्यासाठी प्रचंड वेळ खर्ची करावा लागतो. राजकीय काम करणं म्हणजे कोळश्याच्या खाणीत काम करण्यासारखं आहे, डाग हा लागणारच. आपण किती नावं ठेवतो हा वाईट तो वाईट असं ठरवतो. पण हे खूप महत्त्वाचं आणि देशाला घडवणारं काम आहे. या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो माझे बरेच राजकीय मित्र आहेत, त्यांना छोट्यातल्या छोट्या मतदार संघातील माणसाचा फोन घ्यावा लागतो, त्यांना वेळ द्यावा लागतो. त्या लोकांमध्ये हे जे गुण आहेत ते माझ्यात आत्ता तरी नाहीत. जग बदलायला आपल्याकडे बरीच मोठी लोकं आहे, मी काय चित्रपट नीट करतोय तेच महत्त्वाचं आहे उगाच मी सगळ्यात लुडबूड करणं योग्य नाही.”
अशा खास शैलीत नागराज मंजुळे यांनी राजकारणाविषयी त्यांची मतं मांडली. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलं आहे. यामध्ये आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. येत्या ७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.