Ghar Banduk Biryani Movie Review : “आता चालंच बिघडवायचीय..” अशी टॅगलाईन जरी असली तरी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे यांच्या अभिनयाने समृद्ध असा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांची चाल चित्रपटगृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरला आहे असं छातीठोकपणे म्हणता येऊ शकणार नाही. सध्या ३० सेकंदाच्या मनोरंजनाच्या दुनियेत तब्बल पावणे तीन तासांसाठी प्रेक्षकांना एकाच जागी बसवून ठेवणं हे सोप्पं काम नव्हे. दिग्दर्शक हेमंत अवताडे यांना याबाबतीत काही प्रमाणात यश मिळालं आहे. एका साध्या कथेची उत्कंठावर्धक मांडणी यासाठी ‘घर बंदूक बिरयानी’ हा नक्कीच एक वेगळा प्रयोग म्हणून गणला जाईल पण व्यवसायाच्या बाबतीत मात्र पुन्हा ‘झुंड’सारखी परिस्थिती नागराज मंजुळे यांच्यावर ओढवू नये असं मनापासून वाटतं.
महाराष्ट्र राज्यातील ‘कोलागड’ परिसरातील नक्षलवादी किंवा उग्रवादी लोकांचा एक गट, त्याच गावात एका ढाब्यावर काम करणारा आचारी आणि पुण्याहून बदली होऊन या परिसरात कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आलेला एक पोलिस अधिकारी यांच्याभोवती हे सारं कथानक रचण्यात आलं आहे. शिवाय घर, बंदूक आणि बिरयानी या गोष्टींचा कथेत आणि पटकथेत केलेला वापरदेखील उत्तम आहे. उग्रवादी संघटनेचा म्होरक्या पल्लम, ढाब्यावर काम करणारा आचारी राजू, आणि पोलिस ऑफिसर राया पाटील या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, आसपासचं राजकीय वातावरण आणि त्यामुळे यांच्यात होणाऱ्या चकमकी याभोवती हे कथानक फिरतं. एकाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे, एकाचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि एकाचा आपलं कुटुंब असावं यासाठीचा संघर्ष यात आपल्याला पाहायला मिळतो जे फार प्रभावी पद्धतीने पटकथेतून उलगडलं आहे. यासाठी लेखक नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहेत. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी बऱ्याच मोठ्या विषयावर भाष्य केलं आहे, अर्थात नागराज मंजुळे चित्रपटात असल्यावर ती गोष्ट येणं स्वाभाविक आहेच. पण या चित्रपटात ती गोष्ट दमदार मसाल्यासह आपल्याला पाहायला मिळते.
आणखी वाचा : “हे देशाला घडवणारं काम…” राजकारणात प्रवेश करण्याबद्दल नागराज मंजुळेंची स्पष्ट भूमिका
याच्या जोडीला दर्जेदार संवाद, ए.वी. प्रफुल्लचंद्र यांचं समर्पक आणि काही ठिकाणी कथेला पुढे घेऊन जाणारं संगीत उत्तम जमून आलं आहे. काही ठिकाणी गाण्यांची लांबी कमी केली असती तर त्या सीन्सचा प्रभाव आणखी जास्त पडला असता कारण काही गाणी खरंच अप्रतिम आहेत तर काही अगदीच फुटकळ आहेत, पण या कथेला ए.वी. प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने उचलून धरलं आहे ही बाब अगदी खरी आहे. याबरोबरच विक्रम अमलादी यांचं छायाचित्रीकरणही रुबाबदार झालं आहे, काही काही ठिकाणी छोट्या चुका आपल्या नजरेत येतात पण त्याकडे कानाडोळा केला जाऊ शकतो. शिवाय चित्रपटातील अॅक्शन सीन्सनीसुद्धा धमाल आणली आहे. प्रथमच नागराज मंजुळे यांना अशा डॅशिंग अवतारात पाहणं सुरुवातीला थोडं विचित्र वाटतं, पण नंतर त्याच्याशी आपण जुळवून घेतो. अॅक्शन, सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीत निर्मात्यांनी कुठेही हात आखडता घेतला नसल्याचं स्पष्टपणे जाणवतं. यामुळेच हा चित्रपट बघताना कुठेही फसवणूक झाल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात येत नाही. विषय गंभीर असला तरी त्याची हलकी फुलकी मांडणी आणि हशा पिकवणारे संवाद ही भट्टी उत्तम जमून आली आहे.
चित्रपटातील कलाकारांचा दांडगा अभिनय ही याची आणखी एक जमेची बाजू. नागराज मंजुळे यांना काही सीन्समध्ये पाहताना आपल्याला अजय देवगणच्या ‘सिंघम’ची आठवण आल्याशिवाय रहात नाही. तरी त्यांनी त्यांच्या मानाने फारच उत्तम काम केलं आहे. आकाश ठोसरही काही सीन्समध्ये उजवा ठरला आहे, तसं त्याच्या पात्राला फारसा वाव नसला तरी त्याने काम उत्तम केलं आहे, सयाजी शिंदे यांचं पल्लम हे पात्र फार मजेशीर, धमाल आणि क्रूर आहे अन् सयाजी यांनी ते अगदी सहज निभावलं आहे. अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासून शेवटपर्यंत सयाजी यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. खासकरून मध्यांतराच्या नंतर लगेचच येणाऱ्या एका सीनमध्ये त्यांनी ‘शूल’मध्ये साकारलेल्या बच्चू यादवची झलक बघायला मिळते. सायली पाटीलनेही तिची भूमिका उत्तम साकारली आहे. याबरोबरच ‘फँड्री’मधला जब्या, ‘सैराट’मधला तानाजी यांनीसुद्धा छोट्या भूमिकेत स्वतःची छाप सोडली आहे.
हे सगळं उत्तम असलं तरी चित्रपटाची लांबी ही यासाठी सर्वात मोठी अडचण ठरू शकते. काही सीन्स मुद्दाम कमर्शियल बनवण्यासाठी ताणण्यात आल्याने पटकथा मध्येच प्रेक्षकांवरची पकड सोडते. शिवाय क्लायमॅक्ससुद्धा खेचल्यासारखा असल्याने त्यातील गांभीर्य निघून जातं. शिवाय उग्रवादी संघटना आणि सरकारी यंत्रणेच्या विरोधात त्यांनी पुकारलेलं बंड याला एक राजकीय रंग देऊन ती गोष्ट वरवरच दाखवल्याने त्याचा प्रभाव म्हणावा तसा प्रेक्षकांवर पडत नाही. इतर हिंदी चित्रपटात दाखवतात तसं सरधोपटपणे यातही उग्रवादी संघटना आणि त्यांच्या लोकांच्या बाबतीत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्लायमॅक्समध्ये पोलिसांनीच एकमेकांवर गोळ्या झाडण्याचा सिक्वेन्स फारच केविलवाणा आणि हास्यास्पद वाटला. कदाचित या चित्रपटातून या गंभीर विषयाची एक वेगळी बाजू नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे दाखवू शकले असते.
आणखी वाचा : Bholaa Movie review : अजयचा जबरदस्त अंदाज, तब्बूचा पोलिसी खाक्या, जबरदस्त ॲक्शनची मेजवानी असलेला ‘भोला’
शिवाय चित्रपटाच्या शेवटी पुढील भागाची दिलेली हिंटसुद्धा काहीशी ठरवून केलेली स्ट्रॅटजी वाटते. सध्या बरेच चित्रपट त्यांच्या सीक्वलची घोषणा पहिल्याच चित्रपटात करतात तसा मोह कदाचित नागराज मंजुळे आणि निर्मात्यांना आवरता आला नसेल. पण तो ट्विस्ट नेमका काय आहे ते स्वतः बघितल्यावरच कळेल. बाकी वैचारिक बाजू, चित्रपटाची लांबी आणि काही ओढून ताणून दाखवलेले सीन्स वगळता ‘घर बंदूक बिरयानी’ हा त्याच्या मांडणीसाठी, दर्जेदार अभिनय आणि दिग्दर्शनासाठी एकदा तरी अवश्य बघायलाच हवा असा आहे.