‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी आपलं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं असतं. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘घरत’ कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला आपल्या भेटीला येणार असून यामध्ये तगड्या कलाकारांची फौज असल्याचं पाहायला मिळत आहे.
नातेसंबंधातील प्रेम, गोडवा विविध सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. घरत कुटुंबात ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
‘घरत गणपती’मध्ये निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यानिमित्ताने बॉलीवूड अभिनेत्री निकिता दत्ता पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी तिने ‘कबीर सिंग’, ‘दंगे’, ‘खाकी’ यांसारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. येत्या जुलै महिन्यात हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.