गिरीजा ओक ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. इतकंच नाही तर जाहिरात क्षेत्रामध्ये देखील गिरिजा ओक हा एक लोकप्रिय चेहरा आहे. आतापर्यंत ती अनेक जाहिरातींमधून झळकली. काही महिन्यांपूर्वी तिने ऑनलाइन रमीचीही जाहिरात केली होती. आता त्यावर तिने भाष्य केलं आहे.
गिरीजा ओकने सौमित्र पोटेच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जाहिरात क्षेत्रातील अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. जाहिराती कशा तयार होतात, जाहिरात स्वीकारताना ती कोणता विचार करते, जाहिरात क्षेत्रात काम करत असताना तिला आलेले अनुभव याबद्दल तिने दिलखुलासपणे संवाद साधला. तर यावेळी तिने रमीची जाहिरात का केली होती, त्यावर प्रेक्षकांच्या आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया याबद्दलही ती बोलली.
ती म्हणाली, “त्या जाहिरातीमुळे मी अजूनही ट्रोल होते.माझ्या वेगवेगळ्या पोस्टवर पण लोकं त्याबद्दल बोलतात. मी जाहिरात केली कारण मी त्याकडे एक प्रोजेक्ट म्हणून पाहिलं. मी जाहिरात न करूनही लोकं खेळणं बंद करणार नाहीत. मी याचा मूल्य वगरे अशा दृष्टीने विचार नाही केला. मी फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करत नाही कारण आपल्या त्वचेचा रंग मुळातच आपल्या हातात नाही. त्यामुळे अशा जाहिरातींची मला चिड येते. कारण हे चुकीचं आहे. पण मी रमी खेळा म्हटलं तर त्याने फार फरक पडेल असं मला वाटत नाही.”
हेही वाचा : Video: “मला खरंच…” भर कार्यक्रमात शाहरुख खानने केलं मराठमोळ्या गिरीजा ओकचं कौतुक, म्हणाला…
पुढे ती म्हणाली, “रमी खेळायची की नाही ही तुमची वैयक्तिक निवड आहे. तुमच्यावर कोणीही सक्ती केलेली नाही. दारू प्यायची की नाही, तंबाखू खायचा की नाही, रमी खेळायची की नाही या तुमच्या चॉइस आहेत. पण ट्रोलर्सचा किती विचार करायचा हे आपल्यावर आहे.”