Gulkand Marathi Movie : प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतं…प्रेमाची हटके अन् मजेशीर गोष्ट सांगणाऱ्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातून एक आगळीवेगळी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘गुलकंद’ सिनेमात प्रेक्षकांना ढवळे आणि माने कुटुंबीय पाहायला मिळतील. सई ताम्हणकर या सिनेमात नीता ढवळे तर, समीर चौघुले मकरंद ढवळे ही भूमिका साकारत आहेत. नीता-मकरंद यांच्या मुलीचं म्हणजेच मीनाक्षीचं ओंकार मानेशी लग्न ठरतं. पण, मुलांचं लग्न ठरल्यावर नीता ढवळे आणि गिरीश माने ( प्रसाद ओक ) यांची मैत्री वाढते आणि सुरू होतो संशय…नीताचा नवरा आणि गिरीशची बायको संशय घेऊन, दोघांचाही पाठलाग करतात. त्यांच्या फोनवर, मेसेजवर लक्ष ठेवून असतात. मग पुढे, या सगळ्यांची कशी तारांबळ उडते, यामध्ये येणारा इमोशनल ड्रामा ही गोष्ट ‘गुलकंद’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आता प्रसाद-सई डेटवर गेल्यावर समीर आणि ईशा काय करणार…यांच्या संसाराचं पुढे काय होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना ट्रेलर पाहून पडतात. ‘गुलकंद’च्या ट्रेलरमध्ये सई आणि समीरची भन्नाट केमेस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेते. लग्न, अफेअर, नवरा-बायकोमधील संशय, संसार या सगळ्यात मुरलेला ‘गुलकंद’ सिनेमा प्रेक्षकांना १ मे रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॉमेडीचं अनोखं कॉम्बिनेशन या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे या ‘गुलकंद’ सिनेमाचे निर्माते आहेत.
नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ‘’या सगळ्यांबरोबर मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक खास बॉण्डिंग आहे आणि आमची हीच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून, प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.’’