‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. कविता, वेबसीरिज आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विजू माने प्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांना आदर्श मानतात. आज गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लवकरच घेणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पहिला लूक आला समोर
गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आलेले गुलजार यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मराठमोळे दिग्दर्शक विजू मानेंनी त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयुष्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्त्वाला भेटल्यावर विजू मानेंच्या मनाची स्थिती काय झाली होती? याविषयी त्यांनी या पोस्टमधून उलगडा केला आहे.
हेही वाचा : “लक्ष्मीच्या पावलांनी हे पदरात…”, ‘बाईपण भारी देवा’ला ५० दिवस पूर्ण, केदार शिंदेंनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत
दिग्दर्शक विजू माने यांची पोस्ट
गुलजारजीनी आमचा ‘बायोस्कोप’ सिनेमा पहिला होता. त्यावर त्यांनी त्यांची मते अगदी प्रांजळपणे सांगितली. आम्ही त्यांना विनंती करत होतो की, आमच्या चार गोष्टींच्या मध्ये त्यांनी येऊन एखादी कविता किंवा तत्सम काहीतरी सादर करावं. ते काही तयार होईनात. त्यांचं म्हणणं होतं, ते ह्या एकूण सिनेमा प्रयोगाबद्दल काहीतरी लिहितील आणि त्यांच्या आवाजात डब करून देतील. ते प्रत्यक्ष दिसणं योग्य होणार नाही. त्यांचे शब्दही आठवतायत. “तुम्हारी इतनी अच्छी अच्छी फिल्मोके बीच मै विजुअली दिखुंगा तो लोगोका attention हट जायेगा. कहेंगे अरे ये वही है ना जिस ने बिडी जलायले लिखा था |“ मी तरीही माझा मुद्दा रेटत होतो की तुम्ही दिसल्याने असं काही होईल असं मला वाटत नाही. त्यावर ते म्हणाले, “बेटा, अगर तुम्हे पता होगा तो मैने भी कुछ फिल्मे डीरेक्ट की है | तो बतौर डीरेक्टर मै भी तो विजुअल्स की भाषा को थोडा थोडा समझता हू |” गुलजारजींच्या शब्दांचा टाळा लागला माझ्या तोंडाला. त्यांची ती भेट सविस्तर लिहीन कधीतरी.
ती भेट संपल्यावर गुलजारजी आम्हाला सोडायला म्हणून अगदी बाहेर पर्यंत आले. आम्हाला ज्याने देवदर्शन घडवलं होतं तो किशोर कदम देखील सोबत होताच. “आजकाल किशोर मुझे कुछ नया सुनाता ही नही” असं म्हणत त्यांनी त्याची खिल्ली उडवली. गप्पांच्या ओघात किशोर म्हणाला, “विजूभी कविताए लिखता है |”
“अच्छा तो सुनावो कुछ.”
बोबडी वळणे, जीभ जड होणे, शब्द गायब होणे. सगळं माझ्या सोबत झालं होतं. काही वेळानंतर उत्तर सुचलं. “नही सर. मै तो आपको सुनना चाहुंगा |”
“क्यू नही. आओ कभी फुरसत की शाम किशोर को लेकर |” साक्षात गुलजार गुरुजींचं आमंत्रण.
‘स्वर्ग उरला दोन बोटे’ ही भावना घेऊन निघालो. अजूनही ती ‘शाम’ काही आली नाही. ह्याबद्दल किशोर तुला माफी नाही…लवकर आणलीस ‘ती’ शाम तर कॉफी नक्की. तूर्तास गुलजारजीना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा कळव. Happy Birthday Guljarji.
दरम्यान, विजू मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने “गुलजारजींची भेट म्हणजे साक्षात देवदर्शन… किती मोठा योग तुम्हाला लाभला…खरोखरचं भाग्यवान आहात” तसेच इतर काही युजर्सनी हार्ट इमोजी, “देवाचे दर्शन” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर दिल्या आहेत.