“काय भावा, कसा आहेस, सर्व ठीक चाललंय ना, काय मदत लागली तर सांग हा नक्की…” असं म्हणतं प्रत्येकालाच आपल्यातील एक वाटणारा आपला सिद्धू म्हणजे अर्थातच अभिनेता सिद्धार्थ जाधव. मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली. कोकणातून मुंबईत येऊन शिकलेला आणि आज त्याच मुंबईत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा सिद्धू हा मनोरंजनसृष्टीतील चमचमता तारा आहे. पण त्याच्या यशामागे बराच संघर्ष, टोमणे आणि खडतर प्रवास आहे!

सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ साली राजापूर येथे झाला. पण त्याचे संपूर्ण बालपण हे मुंबईतील कामगारबहुल असलेल्या शिवडी परिसरात गेले. शिवडी परिसरातच तो लहानाचा मोठा झाला. सिद्धार्थ हा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला मुलगा, त्याचे वडील लॅब टेक्निशिअन होते; तर आईने पूर्णपणे गृहिणी म्हणून जबाबदारी स्वीकारलेली. या कुटुंबाने कष्टातून दिवस काढले, साहजिकच सिद्धार्थचे पहिली ते चौथी हे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्याचे पुढचे शिक्षण सरस्वती विद्यामंदीर, हिंदमाता या शाळेत झाले. शाळेत असताना सिद्धार्थ नाटकात सहभागी व्हायचा.
आणखी वाचा : आज लाखो रुपये मानधन आकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई होती ‘इतकी’ रुपये, खुलासा करत म्हणाला, “ते पैसे मी…”

सिद्धार्थने साधारण ८ ते १० वर्षाचा असताना ‘चांभारचौकशा’ या बालनाट्याद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हे नाटक अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर सिद्धार्थने रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला, तिथेही त्याची नाटकाची आवड सुरूच राहिली. त्याला पहिला ब्रेक मिळाला तो दूरदर्शनवरील ‘सुपरस्टार’ या देशातील पहिल्यावहिल्या रिअॅलिटी शोचा विजेता म्हणून. यानंतर मात्र त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही.

सिद्धार्थ जाधव हा अभिनयच्या क्षेत्रात असला, तरी त्याला पोलीस होण्याची प्रचंड इच्छा होती. “मला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. मला अंगावर ती वर्दी घालून मिरवण्याची हौस होते. माझे मामा हे होमगार्ड होते. ते रक्षाबंधन आणि सणाच्यावेळी घरी यायचे, त्यावेळी त्यांच्या बुटांचा आवाज यायचा. त्यामुळे मला असं कायम वाटायचं की, असं काही तरी आयुष्यात करायला हवं… त्यामुळे मी व्यायाम करणं, एनसीसीमध्ये जाणं या दृष्टीने माझा प्रवास सुरु होता. मी अभिनय हा कधीच गंभीरपणे केला नाही, फक्त टाईमपास म्हणून मी हे करत होतो”, सिद्धार्थ सांगत होता… रुपारेलमध्ये तो अनेक एकांकिकांमध्ये सहभागी व्हायचा. देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून तो सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. सिद्धार्थने दूरदर्शन सह्याद्रीवरील ‘एक शून्य बाबूराव’ या कार्यक्रमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो ‘हसा चकट फू”, ‘घडलंय बिघडलंय’, ‘आपण यांना पाहिलंत का?’ यांसारख्या अनेक कार्यक्रमात झळकला.

आणखी वाचा : मुंबईमध्ये आई-वडील भाड्याच्या घरात राहिले अन्…; सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तो’ प्रसंग, नवीन घर खरेदी केलं कारण…

सिद्धार्थ जाधवने २००४ साली केदार शिंदे यांच्या ‘अग्गंबाई अरेच्चा’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ‘जत्रा’ या चित्रपटासाठी त्याच्याकडे विचारणा करण्यात आली, त्यानंतर तो खरा प्रसिद्धीच्या झोतात आला. सिद्धार्थने ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘साडे माडे तीन’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘टाइम प्लीज’, ‘दे धक्का’, ‘यांचा काही नेम नाही’ यांसारख्या चित्रपटात झळकला. एकीकडे चित्रपट करत असताना दुसरीकडे दूरदर्शन तसेच रंगमंचावरही त्याने दमदार भूमिका साकारल्या.

“पंढरीनाथ कांबळी, केदार शिंदे, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर या कलाकारांनी मला कायमच पाठिंबा दिला आहे. महेश मांजरेकर मला नेहमी सांगायचे की तू विनोदी कलाकार नाही, तू कलाकार आहेस. विनोद करणं हे तुझ्यातील एक वैशिष्ट्य आहे. मोठ्या पडद्यावर माझी वेगळी बाजू त्यांनीच ओळखून साकारण्यास मदत केली. मी हसल्यावर लोकांना हसवण्याची आणि रडल्यावर रडवण्याची प्रतिभा माझ्यात आहे हे मला सांगणारेही तेच होते. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी अशा मोठ्या कलावंतांसोबत काम केले आणि त्यांच्याशी मी जोडले गेलो”, सिद्धार्थ सांगतो…

आणखी वाचा : Video : कधीकाळी ५० रुपयांचं टी-शर्ट, मित्राचे कपडे घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवचं नाव कपड्यांच्या ब्रँडवर झळकतं तेव्हा…; व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आपला सिद्धू हा हिंदी सिनेसृष्टीतही तितकाच सक्रिय आहे. सिद्धार्थने ‘गोलमान फन अनलिमिटेड’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानतंर तो ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘पावडर’, ‘गौर हरी दास्तान’, ‘सिम्बा’, ‘राधे’, ‘सूर्यवंशी’, ‘सर्कस’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकला. सिद्धार्थला ‘गोलमाल’ हा पहिला हिंदी चित्रपट ‘लोच्या झाला रे’ या नाटकामुळे मिळाला.

विविध नाटकांत आणि चित्रपटात झळकणाऱ्या सिद्धार्थ जाधवला आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांनाही सामोरी जावे लागले. २०१३ ते २०१७ या काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्याच्यासाठी ती चार वर्षे अत्यंत खडतर होती. २०१७ नंतर सिद्धार्थची गाडी पुन्हा रुळावर आली आणि सुसाट धावू लागली. त्याने ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट केला. यादरम्यान त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अभिनयात सुरुवातीच्या काळात दिसण्यावरुन हिणवलं जायचं, असा कोण अभिनेता असतो का?, तू मरत का नाहीस? अशा स्वरूपाच्या कमेंट्सही करण्यात आल्या. त्याबरोबरच दिग्दर्शकांनीही त्याला शिवीगाळही केली होती. यामुळे त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. वडील प्लाझा चित्रपटगृहाच्या बाहेर पेपर टाकून झोपायचे. आज तिथेच समोरच्याच रस्त्यावर असेलल्या टॉवरमध्ये घर घेतलं आहे, असे त्याने अभिमानाने सांगितले होते. उत्तम अभिनयशैली, साधी राहणी आणि प्रत्येकाला अगदी आपल्यातील एक वाटणारा सिद्धार्थ हा त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. ‘कॉमेडी किंग’ म्हणूनही त्याला ओळखले जाते. अशा या आपल्या सिद्धूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!