छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी, लढायांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगभरातील लोकांना प्रेरित केले. यापैकीच एक महत्वाची घटना म्हणजे पावनखिंडीतील लढाई. या लढाईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या धैर्यवान अशा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासह असणाऱ्या मावळ्यांची प्रचिती शत्रूला आली. या सगळ्यात बाजीप्रभूंना साथ लाभली ती एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीची ती म्हणजे फुलाजीप्रभू देशपांडे यांची. फुलाजी देशपांडे म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू. पावनखिंडीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांच्या अनोख्या नात्याबद्दल अनेक जण अनभिज्ञ आहेत. हेच नाते ‘हर हर महादेव’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटात फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अशोक शिंदे यांनी साकारली आहे. तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक शिंदे यांचा हा १५१वा चित्रपट आहे. आजवर त्यांनी अनेक नायक आणि खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. पण ऐतिहासिक भूमिका साकारण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
आणखी वाचा- ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी आवाज का दिलात? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
आपल्या या अनुभवाबद्दल अशोक शिंदे म्हणतात, ” माझ्या आजवरच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत अशा प्रकारची भूमिका साकारण्याची मला संधीच मिळाली नाही. मात्र ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने माझं हे स्वप्न साकार होत आहे. मुळात हा चित्रपट आपल्या मुळाशी जोडला जाणारा आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या भव्य नाटकासाठी मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले होते. त्यामुळे माझ्यात या व्यक्तिरेखा अक्षरशः भिनलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा संपूर्ण प्रवास या सगळ्याचा अनेक वर्षांचा माझा अभ्यास होता. त्यावेळी माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी मला त्यावेळी एका भूमिकेसाठी विचारणा केली होती, मात्र काही कारणास्तव मी ती केली नाही.”
अशोक शिंदे पुढे म्हणाले, “ऐतिहासिक भूमिका साकारण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि बऱ्याच वर्षांनी ही संधी मला अभिजीत देशपांडे यांनी दिली. अर्थात माझा अभ्यास असल्याने फुलाजी प्रभू देशपांडे मला माहित होते, फुलाजी प्रभू हे खूप मोठे योद्धे होतेच, परंतु ते कधी फारसे प्रकाशझोतात आले नाहीत. मात्र त्यांच्या व्यक्तिरेखेला अधोरेखित केले आहे अभिजित सरांनी. फुलाजी प्रभू यांच्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत, ज्यात मी कुठेच बसत नव्हतो. तरीही अभिजीत सरांनी ही व्यक्तिरेखा माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशीच साकारून घेतली आहे. मी खरंच झी स्टुडिओज, सुनील फडतरे, मंगेश कुलकर्णी, अभिजीत सरांचा खूप आभारी आहे. ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.”
अभिजीत देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची असून यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी पाच भाषांमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.