ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये काल मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्याने सध्या सगळीकडेच याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये जाऊन तिथला शो बंद पाडला आणि काही प्रेक्षकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला, त्यानंतर सगळ्याच स्तरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. राष्ट्रवादीने शो बंद पाडला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो पुन्हा सुरू केला. एकूणच या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे असं बऱ्याच लोकांनी मत व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी याबाबत ट्वीट करत या प्रकरणाचा निषेध नोंदवला. नुकतंच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे आरोप चित्रपट निर्मात्यांवर केले आहेत. त्याबद्दलसुद्धा अभिजीत यांनी वक्तव्य दिलं. या चित्रपटाशी निगडीत जेवढे पुरावे आवश्यक होते तेवढे सादर करूनच आम्हाला यासाठी प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही अभिजीत यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : आता भोजपुरी चित्रपटानेही टाकली कात, रवी किशन घेऊन येत आहेत पहिला ‘भोजपुरी पॅन इंडिया चित्रपट’

चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुनसुद्धा वाद निर्माण झाला आहे. त्याविषयी बोलताना अभिजीत म्हणाले, “याविषयी आम्ही आमच्या टीमकडून अधिकृत स्टेटमेंट लवकरच देणार आहोत. त्यामध्ये या सगळ्याबद्दल आम्ही विस्तृतपणे स्पष्टीकरण दिलं जाईल. आजवर आपल्याला जो इतिहास शिकवला गेला आहे, तो तेवढाच मर्यादित नाही. विविध बखरी, दस्तऐवज, यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, वेगवेगळ्या इतिहासकारांशी याबद्दल चर्चा केली जाते तेव्हा या सगळ्या अभ्यासातूनच हे संदर्भ आपल्याला सापडतात. बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील या प्रसंगाबद्दल आम्हालाही सेन्सॉर बोर्डने शंका विचारली होती. यावर आम्ही योग्य पुरावेदेखील सादर केले आहेत. केळूसकरांसारख्या मोठ्या इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख जसाच्या तसा आहे, केळूसकर यांना सत्यशोधक म्हणून ओळखलं जायचं. त्यांनी ज्योतिबा फुले यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील प्रेरणा मिळाली होती. अशा महान इतिहासकाराच्या संदर्भावरच आम्ही ते दृश्यं चित्रपटात दाखवलं आहे.”

शिवाय जर एखादं दृश्यं किंवा एखादी ऐतिहासिक घटना न पटल्यास त्याबद्दल संवैधानिक पद्धतीने मत मांडणं, कोर्टात वाद घालणं हा योग्य मार्ग आहे, पण असं एखाद्या प्रेक्षकाला मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं अभिजीत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय याविरोधात कडक कारवाई व्हायला हवी अशीही त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान या वादात मनसेकडून चित्रपटाला आणि त्यातील कलाकारांना पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रवादी वि. मनसे असं चित्रदेखील निर्माण झाल्याचं दिसत आहे.