ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणात कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. ‘हर हर महादेव’ चित्रपट आपण पाहिला नसून नेमका वाद काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही. मात्र लोकशाही पद्धतीने विरोध करावा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

कारवाई होईल…
पत्रकारांनी ‘हर हर महादेव’ वादासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, “लोकशाही माध्यमातून विरोध करण्यास पूर्णपणे परवानगी आहे. मात्र लोकशाहीच्या विरोधात जाऊन एखाद्या ठिकाणी लोकांना मारहाण करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणात कारवाई होईल,” असं उत्तर दिलं. या प्रकरणामध्ये  जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात काय वाद आहे मला…
फडणवीस यांना चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

ठाण्यात आजही पडसाद उमटणार…
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर  मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत पुन्हा हा शो सुरू केला होता. या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. मनसेने याच मॉलमध्ये सायंकाळी ६:१५ वाजता मोफत शो ठेवला आहे. विवियाना मॉलपासून हाकेच्या अंतरावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान असल्याने राष्ट्रवादी- मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> “सुप्रिया तुला अधिक…” सत्तारांचा शिवीगाळ करतानाचा Video शेअर करत सदानंद सुळेंची पोस्ट; म्हणाले, “हे नव्या पुढारलेल्या सरकारचे…”

काही अंतरावरच आव्हाडांचं घर
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी रात्री १० वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. या घटनेत एका प्रेक्षकाला मारहाणही झाली होती. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात आले. त्यांनी हा शो पुन्हा सुरू केला. मंगळवारीही विवियाना मॉलमध्ये मनसेने मोफत शो आयोजित केला आहे. मॉल पासून काही अंतरावरच जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पोलिसांनी मॉलच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har har mahadev movie issue forcibly closing show maharashtra home minister devendra fadnavis reacts scsg