नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये हेमांगी कवीने तिच्या अभिनयाची एक वेगळी मोहोर उमटवली आहे. अलीकडेच अभिनेत्री रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ सीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये हेमांगीने काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. अभियाबरोबरच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत हेमांगीने सामाजिक विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला. स्त्रियांना मिळणारं काम, पुरुष कलाकारांच्या तुलनेत कमी मिळणारं मानधन याविषयी तिने भाष्य केलं.
हेमांगी कवी म्हणाली, “मी अजिबात बंडखोर वगैरे नाहीये. मला जे योग्य वाटतं ते मी नेहमीच बोलते. आपल्याकडे अनेकदा अभिनेत्रींना गप्प बस, काही बोलू नकोस यामुळे तुझं काम जाईल असं सांगण्यात येतं. पण, मी या गोष्टींना दुजोरा देत नाही. कलाकार होण्याआधी मी आधी एक नागरिक आहे. त्यामुळे समाजात कोणत्याही स्तरावर अन्याय होत असेल किंवा जे मला पटत नाही अशा सगळ्या विषयांवर मी व्यक्त होते. संस्कार आणि संस्कृतीच्या नावाखाली बायकांना गप्प बसवणं मला आवडतं नाही. त्यांनाही प्रश्न विचारण्याचा तेवढाच हक्क आहे.”
हेही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्टने का नेसली लग्नाची साडी? अभिनेत्रीचा खुलासा ऐकून सर्वत्र होतंय कौतुक
सिनेमामध्ये अभिनेत्रींना आजही दुय्यम स्थान आहे का? यावर हेमांगी म्हणाली, “फक्त चित्रपट किंवा मनोरंजन विश्वात हा प्रकार आहे असं नाही. प्रत्येक क्षेत्रात असंच सुरू आहे. महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणं आजही अनेकांना आवडत नाही. यात कमीपणाचं काय आहे? हे मला अजूनही कळालेलं नाही. यापुढे समान स्क्रीनटाइम, समान मानधन या गोष्टी फार नंतरच्या आहेत.”
हेही वाचा : Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…
“बाई किती सोशिक आहे, बाई कसा अन्याय सहन करते या पलीकडे जाऊन बाई एक स्वत:चं वेगळं आयुष्य जगत असते असे विषय दाखवले पाहिजेत. स्त्रीसुखाबाबत कधीच भाष्य केलं जात नाही आणि ज्या चित्रपटांमध्ये असे विषय हाताळले जातात त्याला बोल्ड किंवा अश्लीलतेचं कवच चढवलं जातं…मला वाटतं या गोष्टी गरजेच्या नाहीत. अलीकडच्या काळात वेबसीरिजच्या माध्यमातून अशा प्रकारचा कन्टेंट हळुहळू बनवला जात आहे. पण, त्या सीरिजकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. मुलींच्या आयुष्यात असे अनेक टप्पे असतात केवळ, ती मोठी होऊन नंतर लग्न करते हा एवढाच प्रवास नसतो. मुलींच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याबद्दल तेवढ्याच खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे.” असं मत हेमांगी कवीने मांडलं.