अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शिरूरचा गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला आहे. अमोल कोल्हेंना ६ लाख ९८ हजार ६९२ मतं तर शिवाजीराव आढळराव यांना ५ लाख ५७ हजार ७४१ मतं मिळाली आहेत. डॉ. कोल्हे यांनी १ लाख ४० हजार ९५१ मतांनी आढळरावांचा पराभव केला आहे. त्यामुळे सध्या डॉ. अमोल कोल्हेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. काही मराठी कलाकारांनी देखील डॉ. कोल्हेंना सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने डॉ. अमोल कोल्हेंच्या विजयानंतर एक्सवर पोस्ट केली होती. अमोल कोल्हेंचा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं होतं, “आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार मा. अमोल कोल्हे यांचा भव्य विजय…खूप खूप अभिनंदन!…आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे… असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा!”

हेही वाचा – कोणी लगावला भाजपाला टोला, तर कोणाचं चपखल भाष्य! लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मराठी कलाकारांच्या पोस्ट चर्चेत

तसंच अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील अमोल कोल्हेंच्या विजयानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली. डॉ. कोल्हेंबरोबरचा फोटो शेअर करत तिनं आनंद व्यक्त केला आहे. “अभिनंदन दादासाहेब #खासदार”, असं फोटोवर लिहिलं आहे. अश्विनीनं अमोल कोल्हेंबरोबर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत काम केलं होतं.

तसंच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं सुद्धा अमोल कोल्हेंसाठी खास पोस्ट केली आहे. डॉ. कोल्हेंबरोबरचे फोटो शेअर करून लिहिलं आहे, “अभिनंदन अमोल दादा. खासदार.”

हेही वाचा – “भारताने द्वेष, भ्रष्टाचार…”, टायटॅनिकचं उदाहरण देऊन स्वरा भास्करने भाजपाला लगावला टोला, म्हणाली…

हेही वाचा – “अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब…”, अयोध्येतील निकालाबद्दल गायक सोनू निगमची पोस्ट; म्हणाला, “५०० वर्षांनंतर राम मंदिर…”

दरम्यान, अमोल कोल्हेंच्या विजयानंतर त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “लोकसभा निवडणूक निष्ठेची, स्वाभिमानाची लढाई होती. शिरूर लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी, सुजाण मतदारांनी निष्ठेला कौल दिला आहे. गेले आठ महिने दररोज सोळा-सोळा तास काम करत होतो. कार्यकर्त्यांसह कुटुंबही प्रचारात सक्रिय होते. विरोधकांनी मतदारसंघात संपर्क नसल्याचा अपप्रचार करण्याचा केलेला प्रयत्न सुजाण मतदारांनी हाणून पाडला.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome prajakta gaikwad and ashwini mahangade reaction on amol kolhe won lok sabha election 2024 pps
Show comments