पॅरिस ऑलिम्पिककडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अविनाश साबळे ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अविनाशची कामगिरी पाहून लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे ( Hemant Dhome ) भारावला आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून अविनाशवर कौतुकाचा वर्षाव केला.
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमेने ( Hemant Dhome ) अविनाश साबळेचा फोटो शेअर करत इन्स्टाग्राम स्टोरीवर खास पोस्ट लिहिली आहे. हेमंत ढोमेने लिहिलं की, “आपल्या बीडचा अविनाश साबळे ३ हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत, ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय…अविनाश आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे….अंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा….#शेतकऱ्याची पोरं.” हेमंत ढोमेची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतं आहे.
हेही वाचा – Video: बायकोची माफी मागत प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, स्वप्नील जोशी म्हणाला, “तुला भीती नाही का?”
अविनाश साबळेने इतक्या मिनिटांत पात्र फेरी केली पूर्ण
माहितीनुसार, ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंचावणारा बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे ( Hemant Dhome ) भारतीय सैन्य दलात सध्या कार्यरत आहे. या स्पर्धेत सुरुवातीपासून अविनाश आघाडीवर होता. नियोजनानुसार तो आपला खेळ खेळताना दिसला. अविनाश साबळेने ८ मिनिट १५.४० सेकंदात पात्र फेरी पूर्ण केली आणि तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. त्याच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे.
दरम्यान, हेमंत ढोमेच्या ( Hemant Dhome ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘क्षणभर विश्रांती’, ‘झिम्मा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बस स्टॉप’, ‘चोरीचा मामला’, ‘ऑनलाइन बिनलाइन’, ‘फकाट’ यांसारख्या अनेक चित्रपटात अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं काम करणाऱ्या हेमंत ढोमेचा शेवटचा चित्रपट ‘झिम्मा २’ प्रदर्शित झाला होता. हेमंतचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव, सुहास जोशी, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार झळकले होते. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासह त्यातील गाणी देखील हीट झाली होती.