राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी तीन मोठ्या सभा घेतल्या. बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चेहऱ्यावरही प्रचंड थकवा जाणवत होता. त्यामुळे सोमवारी (६ मे) त्यांचे बरेच कार्यक्रम रद्द करण्यात आले. मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने यासंदर्भात एक्स पोस्ट शेअर करत काळजी व्यक्त केली आहे.
मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या हेमंतने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेमंत ढोमेने शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्यांना काळजी घ्या अशी विनंती केली आहे. बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी एकूण तीन सभा घेतल्या. परंतु, शेवटची सभा पार पडण्यापूर्वीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली व पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले.
हेमंत ढोमेने ट्विट करत शरद पवारांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. “आदरणीय साहेब…आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा…खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
हेही वाचा : “लग्नाआधी ३ वर्षे एकत्र राहिलो”, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल म्हणाले, “आई बाबांनी…”
दरम्यान, बारमतीमध्ये रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. ७ मे रोजी ( मंगळवारी ) बारामतीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव आज (सोमवारी) शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
हेही वाचा : Video : ‘गुलाबी साडी’ गाण्याची नेहा कक्करला पडली भुरळ! संजू राठोडचं केलं कौतुक, म्हणाली…
याशिवाय हेमंत ढोमेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता येत्या काळात हेमंत कोणते नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.