मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘सनी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. घरापासून दूर असलेल्या एका तरुणाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांचाही चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण असं असताना काही प्रेक्षकांना मात्र तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने चित्रपटाचे शो कॅन्सल केले. याबाबत हेमंतनेच ट्वीट करत माहिती दिली.
मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉटही हेमंतने शेअर केला. आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. हेमंत म्हणाला, “शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) माझा ‘सनी’ चित्रपट प्रदर्शित झाला. १८१ चित्रपटगृह आणि जवळपास ३०० पेक्षा अधिक स्क्रिनवर ‘सनी’ दाखवण्यात आला. शुक्रवारी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक संख्या कमी असल्याने शुक्रवारी रात्री किंवा शनिवारीच (१९ नोव्हेंबर) चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले.”
आणखी वाचा – “तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट
“काल रविवारी (२० नोव्हेंबर) व आज सोमवारी या चित्रपटाचे शो आणखीनच कमी झाले आहेत. म्हणजे माझ्या मराठी चित्रपटाला हक्काचा विकेण्डही मिळू दिला नाही. आता निम्म्यापेक्षा कमी शो आहेत. काही भागांमध्ये तर चित्रपट दिसतही नाही. दादर, पार्ले, सांगली, सातारा अशा अनेक भागांमधून यासंदर्भात मला फोन आले आहेत. प्रत्येक चित्रपटाला हक्काचा एक आठवडा मिळायलाच हवा. ‘सनी’च्या आधीही ‘गोदावरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटालाही हक्काचे एक आठवड्याचे शो मिळाले नाहीत. हे फक्त या दोन चित्रपटांबाबतच नाही. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटाला त्याचा हक्काचा एक आठवडा, एक शो मिळायलाच हवा.”
सरकारला विनंती करत हेमंत म्हणाला, “माझी सरकारला एक विनंती आहे की, कृपया एक कठोर कायदा अमलात आणावा. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक भागात हक्काचा एक शो मिळेल. तसेच कमीत कमी एक आठवड्याचा वेळ मराठी चित्रपटाला मिळेल. अशी पुन्हा एकदा मी सरकारला कळकळची विनंती करतो.”
“प्रेक्षक तिकिटं बुक करत आहेत तरीही त्यांची तिकिटं रद्द करून शो कॅन्सल झाले असल्याचा मॅसेज प्रेक्षकांना करण्यात येत आहे. कारण समोर सुरू असलेला एक हिंदी चित्रपट जोरात चालू आहे. आणि तो चालावाच याचा मला आनंद आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण या सगळ्यामध्ये मराठी चित्रपट डावलला जात आहे. ते ही आपल्या महाराष्ट्रातच.” असं म्हणत हेमंतने संताप व्यक्त केला.