सध्या महाराष्ट्रात ऐतिहासिक चित्रपटांचा मुद्दा बराच तापला आहे. चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करून दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात असून त्यावरून महाराष्ट्राचं राजकारणही तापल्याचं दिसत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटा छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखवलेला इतिहास आणि नुकतीच घोषणा झालेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची स्टार कास्ट या सगळ्याला संपूर्ण राज्यातून विरोध होताना दिसत आहे. ऐतिहासिक चित्रपटांचा हा मुद्दा चर्चेत असताना आता दिग्दर्शक भालाजी पेंढारकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे.
सध्या मनोरंजनसृष्टीत एका मागोमाग एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यावरून सध्या खूप वाद सुरू आहेत. याशिवाय महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली ज्यातील स्टार कास्टवरून सध्या टीका होताना दिसत आहे. तसेच आजकाल कोणताही अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो असंही बोललं जात आहे. अशात चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची चर्चा होताना दिसतेय आणि त्यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.
आणखी वाचा-“तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा
काय आहे व्हायरल पोस्ट?
पन्हाळ्यावर ‘छत्रपती शिवाजी’ या श्री. भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. घोड्यावरुन छत्रपती श्री. शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावर ते घोडे दोन पाय वर करुन थांबते असा तो सीन होता. घोडे नेहमीचे सवयीचे होते. चंद्रकांतांनाही घोड्यावर बसण्याची चांगली सवय होती. दोन-तीन वेळा शॉट रिटेक झाला तरी भालजींचे समाधान होत नव्हते. “घोडा जोरात दौडत येत होता. बरोबर ऐन कड्यावर थांबत होता.” चंद्रकांत सांगत होते, “पण माझ्या चेहऱ्यावर जे भाव हवे होते, ते काही भालजींना मिळत नव्हते. माझ्याही मनात एक सूक्ष्म भिती तरळत होती न जाणो घोडे थांबले नाही तर? मी आणि घोडा दोघेही कड्यावरुन खाली! नेमकी तीच भावना माझ्या चेहऱ्यावर शॉटच्या वेळी येत होती. भालजींच्या ते लक्षात आलं ते बसल्या जागीच ओरडले, ‘चंद्रकांत, घाबरु नकोस; मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील.’ मी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात होतो. त्या शब्दांनी काय जादू झाली, कुणास ठाऊक. पण पुढच्याच टेकला शॉट ओके झाला.”
हा किस्सा आनंद देशपांडे यांच्या ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकातील आहे. पण सध्या महाराष्ट्रात ऐतिहासिक चित्रपटांवरून टीका होत असताना ही पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी याबद्दल भाष्य केले होते. “आजवर आपल्याला जो इतिहास शिकवला गेला आहे, तो तेवढाच मर्यादित नाही. विविध बखरी, दस्तऐवज, यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, वेगवेगळ्या इतिहासकारांशी याबद्दल चर्चा केली जाते तेव्हा या सगळ्या अभ्यासातूनच हे संदर्भ आपल्याला सापडतात. बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील या प्रसंगाबद्दल आम्हालाही सेन्सॉर बोर्डने शंका विचारली होती. यावर आम्ही योग्य पुरावेदेखील सादर केले आहेत.” असे ते म्हणाले होते.