अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या देखील अभिनेत्री आहेत, हे सर्वश्रुत आहे. गेल्यावर्षी सीमा चांदेकर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या. सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण अभिनेत्याने आईला दुसऱ्या लग्नासाठी कसं तयार केलं? तिची कशी समजूत काढली? आणि मग सीमा चांदेकर दुसऱ्या लग्नासाठी कशा तयार झाल्या? याविषयी सिद्धार्थने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा अभिनेता म्हणाला, “जेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा आईच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट आली, तेव्हा मी भयंकर घाबरून गेलो होतो. कारण जेव्हा मुलीचं लग्न होतं, तेव्हा बापाच्या मनात जे काही चालू असतं तसंच माझ्या मनात चालू होतं. आम्ही अनेकदा आमच्या भूमिका बदलल्या आहेत. आईने मला वाढवलंय, तिचं पोरगं म्हणून मोठ केलंय. काही वेळेला मी सुद्धा तिला मुलीसारखं सांभाळलंय. वडील म्हणून काही तिने हट्ट केलेत, अशी आम्ही भूमिकाही बदलली आहे. आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी पहिल्यांदा मला दडपण आलं होतं. हा आपल्या डोक्यात काय विचार आलाय? असं वाटतं होतं.”
हेही वाचा – शेजारचे मुद्दाम विचारायचे खोचक प्रश्न; सिद्धार्थ चांदेकर ‘तो’ काळ आठवत म्हणाला…
पुढे सिद्धार्थ म्हणाला, “मी जेव्हा आईला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं तेव्हा आई म्हणाली, मला नाही वाटतं हे शक्य आहे. यावरून ती मला अजिबात ओरडली नाही. तिने अत्यंत सौम्यपणे उत्तर दिलं. कारण खूप सोसलेल्या व्यक्तीने एका पॉइंटनंतर लाऊड रिअॅक्शन देणं सोडून दिलं असतं. कारण इतकं रिअॅक्ट करून करून ती नजरचं गेलेली असती की, आता काय रिअॅक्ट करायचं ते. मला असं वाटतं, एखादी व्यक्ती खूप साऱ्या अनुभवातून, परिस्थितीतून जाते तेव्हा त्यातून बाहेर पडल्यानंतर ती व्यक्ती शांत होते. कशाला, कधी, कसं, केव्हा रिअॅक्ट करायचं हेच त्या व्यक्तीला कळलं असतं. म्हणून माझ्या आईची रिअॅक्शन तशी होती की, मला नाही वाटतं. तुझा विचार मला कळला आहे, पण हे आता माझ्याकडून होईल, हे वाटतं नाही.”
“मी हळूहळू माझ्या डोक्यात आलेला विचार तिच्यात डोक्यात भरण्याचा प्रयत्न केला. कारण दोन गोष्टी मला कळल्या. एक म्हणजे मी मुलगा आहे. तिचा सांभाळ करू शकतो. हे सगळं आहे. जे मी कायम करत राहीन. पण मला हे स्वीकार करायला पाहिजे की, माझ्याकडून तिला तो संवाद मिळणार नाहीये जो पन्नाशीनंतर एका बाईला रोजचा संवाद तिच्या जोडीदाराकडून हवा असेल. आपण जोडीदार या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. की, आपले पालक एकटेच असतील तर त्यांना कुठल्याच जोडीदाराची गरज नाही. मी आहेत ना. कसली गरज आहे आईला, तिचा मुलगा आहे, मुलगी कमवतेय. तिचं लग्न झालंय. सगळं चांगलं आहे की. मग जोडीदार कशाला पाहिजे?”
“पण, तिला रोज रात्री काय संवाद लागत असेल? मला थोडी ते कळणार आहे. किंवा तिच्या मुलीला देखील कळणार नाही. फक्त तिलाच कळणार आहे. माझ्याशी बोलून ती मला चार गोष्टी माझ्या विचारेल. मी तिला विचारेन. पण खरंतर हा संवाद नसतो, ज्याची तिला गरज असते. ते मला जाणवलं. मग तिला माझी दुसरं लग्न करायची गोष्ट पटली. त्यावेळी तिच्या डोक्यात पहिल्यांदा हेच आलं होतं की, लोक काय म्हणतील? पण मी म्हणालो, आजपर्यंत लोक काय म्हणतील याला सामोर जात इथंपर्यंत आलो की. आपण चांगलं केलं. जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं तिथंपासून ते आपल्याकडे आज असेपर्यंत जे आपलं म्हणण्यासारखं आहे, हे आपण बनवलं की. अजून परत बनवू. लोक आपलं आयुष्य नाही जगत आहेत, ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून आपल्या आयुष्यात बघणं त्यांना विचित्रचं वाटू शकतं. पण जेव्हा ते आपलं आयुष्य जगतील तेव्हा त्यांना समजेल की, या कुटुंबाची ही गरज आहे. त्यामुळे हे कदाचित लोकांना कळेल किंवा नाही कळेल, तुला जर का पटतं असेल, योग्य वाटतं असेल तरच आपण ही गोष्ट करणार आहोत. हे मी तिला जितकं समजवलं. तितकेच तिला प्रश्न विचारले. मग नंतर तिला आत्मविश्वास आला की, मला योग्य वाटतंय. हे आपण करावं. म्हटलं ओके. त्यानंतर त्या पद्धतीने शोधा शोध झाली आणि ते सुद्धा झालं. मग हे घडलं, मी एकेदिवशी फोटो टाकला तेव्हाच लोकांना कळलं. पण हे दीड, एक वर्ष सगळं काही सुरू होतं,” असं सिद्धार्थ म्हणाला.