काही कलाकार हे विविध भूमिकांमधून आपली वेगळी जागा निर्माण करतात. हृषिकेश जोशी त्यापैकी एक आहेत. चित्रपट, मालिका, नाटक व वेब सीरिज या माध्यमांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘देओल’, ‘आजचा दिवस माझा’, ‘येलो’, ‘पोस्टर बॉईज’, ‘मिस ‘यू मिस्टर’, ‘विष्णुपंत दामले : द अनसंग हीरो ऑफ टॉकीज’, ‘दे धक्का’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, अशा अनेक चित्रपटांत ते महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत. याबरोबरच ते अनेक नाटकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता त्यांनी, एका नाटकाच्या तिकिटासाठी ६ किलोमीटर रांग लागली होती, असे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

काय म्हणाले हृषिकेश जोशी?

अभिनेते हृषिकेश जोशी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. १९२१ मध्ये एक घटना घडली होती. त्यावर आधारित हृषिकेश जोशी यांचे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नवीन नाटक आहे. मुलाखतीत त्यांना विचारले की, दोन दिग्गज कलाकार केशवराव भोसले आणि बालगंधर्व एकत्र आले, एका नाटकात त्यांनी काम केले. याबाबत मोठा बोलबाला त्या काळात झाला होता. पण, हे नेमकं काय आणि कसं घडलं होतं आणि हे तुझ्या नाटकात तू नेमक्या कशा पद्धतीनं मांडणार आहेस, या प्रश्नाचं उत्तर देताना हृषिकेश जोशी यांनी म्हटले, “‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ याकडे मी नंतर येतो. पण, त्याआधी संगीत मानापमान, संयुक्त मानापमान असे पदर आहेत, त्याविषयी सागंतो. १९१५ सालचं काकासाहेब खाडिलकरांचे ते नाटक आहे.”

“पहिली सुभद्रा म्हणून भाऊराव कोलटकर आले. अण्णासाहेब किर्लोस्करांनी त्यांना आणलं होतं. भाऊराव कोलटकर यांनी तेव्हा ठरवलं की, वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर स्त्रीची भूमिका करणं योग्य नाही. आता सुभद्रेच्या भूमिकेसाठी नवीन गायक कलावंत हवा. त्या काळच्या जशा ऑडिशन्स असतील तशा त्यांनी त्या घेतल्या. पण त्यांना कोणी मिळेना. साडेसहा रुपये तोळे जेव्हा सोनं होतं. त्या काळात तर त्यांनी जाहिरात दिली की, माझ्या गायकीच्या जवळ जाणारा गायक मिळाला, तर त्याला ५०० रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. पण, त्यानंतरही कोणी मिळालं नाही. त्यानंतर बालगंधर्व आले. गंधर्व नाटक मंडळी ही त्यांची स्वत:ची नाटक कंपनी होती.”

हेही वाचा: अक्षरांचा अन् अंकांचा गोंधळ, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, “त्याने शक्कल…”

“दुसरीकडे केशवराव भोसले होते; ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वत:ची ललित कलादर्श संगीत नाटक मंडळी ही नाटक कंपनी उभी केली होती. खाडिलकरांनी स्वत: लिहिलेले नाटक दोन्ही कंपन्यांना दिले होते. ‘ललित कलादर्श’मध्ये केशवराव भोसले हे धैर्यधरची भूमिका करायचे आणि दुसरीकडे गंधर्व भामीची भूमिका करायचे. लोकांमध्ये विशिष्ट पद्धतीची अनेक वर्षे स्पर्धा होती की गंधर्व श्रेष्ठ की केशवराव श्रेष्ठ? दरम्यानच्या काळात गंधर्व नाटक कंपनी डबघाईला आली. परिस्थिती अशी उद्भवली की, गंधर्व नाटक कंपनीच्या लोकांनी गंधर्वांना केशवरांवांबरोबर प्रयोग करण्याबाबत सुचवले. त्यावेळी गंधर्व केशवरावांना स्वत: भेटायला गेले. केशवरावांनी त्यांना म्हटले की, तुमची नाटक कंपनी चालणे हे रंगभूमीसाठी महत्त्वाचे आहे. तुमचं कर्ज फिटेपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. त्यानंतर त्या दोघांचा एकत्र प्रयोग जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात ठरला आणि ८ जुलै १९२१ ला तो झाला. हा प्रयोग बालीवाला येथे झाला. ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाच्या तिकिटासाठी सहा किलोमीटर रांग लागलेली होती. फक्त एक जाहिरात होती”, असा किस्सा हृषिकेश जोशी यांनी सांगितला आहे.

दरम्यान, हृषिकेश जोशींचे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.