अभिनेत दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कित्येक कलाकारांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन हृषिकेश यांनीच केलं होतं. इतकंच नव्हे तर यात एक वेगळी भूमिकासुद्धा हृषिकेश यांनी साकारली होती.

आपल्या अभिनयाबरोबरच हजरजबाबीपणासाठी हृषिकेश जोशी ओळखले जातात. तसेच ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. नुकतीच त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हृषिकेश यांनी त्यांच्याच चित्रपटातील एका पात्राच्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. हृषिकेश जोशी यांनी गिरीश व उमेश कुलकर्णी यांच्या ‘देऊळ’ या चित्रपटात जांभूवंतराव उर्फ टॉम्या ही छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. अत्यंत आळशी असं हे पात्र हृषिकेश यांनी हुबेहूब वठवलं होतं.

आणखी वाचा : प्लॅस्टिक म्हणजे ऐश्वर्या राय असं उत्तर ‘कॉफी विथ करण’मध्ये देणाऱ्या इमरान हाश्मीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “तुमचे शत्रू…”

पायावरील डोंगळा उडवायलाही कंटाळा करणाऱ्या या पात्राच्या तोंडचा एक डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला तो म्हणजे, “मनात हाय पन बॉडी नाय म्हनती.” याच पात्राला आणि त्याच्या या अजरामर डायलॉगला समोर ठेवून हृषिकेश यांच्या एका चाहत्याने एक रांगोळी काढली आहे. त्यात असं लिहिलं आहे की, “चांगली रांगोळी काढणं मनात हाय निसतं, पण बॉडी नाय म्हनती.” अन् याबरोबरच हृषिकेश यांचा चेहेराही आपल्याला या रांगोळीमध्ये पाहायला मिळत आहे.

hrishikesh-joshi-post
फोटो : सोशल मिडिया

हा रांगोळीचा फोटो चक्क हृषिकेश जोशी यांच्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी तो फार आनंदाने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना हृषिकेश लिहितात, “हे जे कोण कलाकार आहेत त्यांना दंडवत. एखादं पात्र लोकांच्या डोक्यात अनेक वर्षे घर करून राहणं हीच लेखकाला दिलेली पावती असते, जे गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांनी लिहिलं होतं अन् मी फक्त सादर केलं होतं.” गिरीश आणि उमेश यांचा ‘देऊळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. नाना पाटेकर, मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, नसीरुद्दीन शाहसारख्या मातब्बर कलाकारांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Story img Loader