मराठी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेगळ्या धाटणीचे, अनोखे कथानक असलेले चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. २०२५ च्या सुरूवातीला ‘फसक्लास दाभाडे’, ‘इलू इलू १९९८’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘संगीत मानापमान’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता आगामी काळात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यामध्ये प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या चित्रपटाचा समावेश आहे. याबरोबरच प्रेक्षक हृता दुर्गुळे(Hruta Durgule) व ललित प्रभाकर(Lalit Prabhakar) यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या चित्रपटाचे नाव काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता हृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.

हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत हटके पद्धतीने चित्रपटाचे नाव काय आहे, याची घोषणा केली आहे. या व्हिडीओमध्ये हृता दुर्गुळे व ललित प्रभाकर यांच्यातील रोमँटिक सीन पाहायला मिळत आहेत. शेवटी ‘आरपार’ असे लिहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘आरपार’ असल्याचे समोर आले आहे. हृताने हा व्हिडीओ शेअर करताना “ती- तू किती प्रेम करतोस माझ्यावर? तो- किती ते माहीत नाही.. पण आरपार प्रेम करतो. क्रेझी लव्ह स्टोरीसाठी माणसं पण क्रेझी लागतात. कारण प्रेमात अधलं-मधलं काही नसतं”, अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने ललित प्रभाकरलादेखील टॅग केल्याचे दिसत आहे.

हृताने शेअर केलेल्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तसेच कमेंट करीत चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री सायली संजीवने कमेंट करीत कौतुक केले आहे. तर चाहत्यांनी हा प्रोमो खूप छान असल्याचे म्हटले आहे. काहींनी तुम्ही दोघे खूप क्यूट दिसत आहात, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. अनेकांनी आम्ही या चित्रपटाची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. बऱ्याच चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, हृता दुर्गुळे लोकप्रिय अभिनेत्री आहे. दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मालिकांत प्रमुख भूमिकेत काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले. तर टाइमपास 3 व अनन्या सारख्या चित्रपटांतून वेगळी ओळख निर्माण केली. तर ललित प्रभाकरने टर्री, मीडियम स्पायसी, स्माईल प्लीज, हम्पी अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. आता या जोडीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader