लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची बॉलीवूडमधल्या बऱ्याच कलाकारांशी चांगली मैत्री आहे. त्यापैकी एक म्हणजे सलमान खान. महेश मांजरेकर यांचं सलमान खानशी खूप चांगलं नातं आहे हे आपण बऱ्याच चित्रपटांतून पाहिलं आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सलमानच्या घरचं जेवण सर्वोत्तम असल्याचं सांगितलं. तसेच त्याची एक विशेष खासियतही त्यांनी सांगितली.
कुणाल विजयकर यांच्या ‘खाने में क्या है?’ या यूट्यूब चॅनेलवर महेश मांजरेकर यांनी मुलाखत दिली. गोरेगाव येथे असलेल्या सुका सुखी या मांजरेकर यांच्या हॉटेलविषयीची ही मुलाखत होती. यावेळी महेश मांजरेकरांना इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण जास्त आवडतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मांजरेकर म्हणाले, “मला सलमान खानच्या घरचं जेवण खूप आवडतं. तो डाएट वगैरेचा जास्त विचार करत नाही. सलमानला मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे मला त्याच्या घरचं जेवण खूप आवडतं.”
संजय दत्तच्या घरातील जेवणाविषयी पुढे मांजरेकर म्हणाले, “सलमानच्या उलट संजय दत्तच्या घरचं जेवण असतं. त्याच्याकडे जास्त मसालेदार जेवण केलं जात नाही. कमी तिखट जेवण केलं जातं. पण, संजय दत्तला जेवण बनवायला खूप आवडतं.”
हेही वाचा – शाहिद कपूरच्या घरात भाड्याने राहणाऱ्या कार्तिक आर्यनने घेतले आलिशान घर; किंमत वाचून थक्क व्हाल
दरम्यान, २०२१ मध्ये ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यामध्ये सलमानचा मेहुणा व अभिनेता आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत दिसला होता. तसेच २०१९ मध्ये महेश मांजरेकरांची कन्या सई हिनं सलमानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.