अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) सध्या त्याच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘दी एआय धर्मा स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुष्करने मुलीला फिल्म इंडस्ट्रीत आणणार नाही, असे म्हटले आहे.

“मी माझ्या मुलीला फिल्म इंडस्टीमध्ये आणणार नाही”

पुष्कर जोगने नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. ट्रोलिंगचा कुटुंबावर जास्त परिणाम होतो का? असे विचारल्यावर उत्तर देताना त्याने म्हटले, “आम्ही कलाकार आहोत. आम्हाला याची सवय आहे; पण तुम्ही माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा. त्यांना सवय नसते. माझी लहान मुलगी आहे, बायको आहे, आई आहे. आईवर याचा खूप परिणाम होतो. तुम्हाला माझं काम आवडलं नाही, तर मला बोला; पण वैयक्तिक गोष्टीवर बोलू नका. आम्ही सगळेच यातून जातो.”

“हे खूप वाईट आहे. म्हणूनच मी माझ्या मुलीला या सगळ्यापासून खूप लांब ठेवलेलं आहे. मला आजच तिच्यासाठी जाहिरातीची ऑफर आली होती. सर, ती जाहिरातीत काम करील का?, असे विचारल्यावर, मी म्हटलं नाही सर. मला तिला चित्रपटसृष्टीत नाही आणायचं. कलाकारांचे मानसिक आरोग्य कोणी बघत नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जातो, ते आम्हाला कोणी विचारत नाही. कलाकार म्हणून अरे, तू ठीक आहेस का? असं कोणी विचारतच नाही. चित्रपट चालला नाही की, लोक तुम्हाला रोज ट्रोल करीत असतात. पण, आमचं मानसिक आरोग्य आम्ही चांगलंच ठेवायचं. कॅमेऱ्यासमोर स्वत:ला कायम आनंदितच दाखवायचं. त्यामुळे तिला यापासून दूर ठेवायचं आहे. कारण- आता आम्ही दररोज ज्या परिस्थितीतून जातो, त्यातून मुलीनं जाऊ नये, असं मला वाटतं”, असे पुष्करने म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: ‘सिंघम अगेनच्या’मधील एका अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगणला २-३ महिने…, सलमान खानने सांगितला ‘तो’ प्रसंग

‘दी एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे, तर हा सिनेमा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक यावर आधारित आहे. पुष्करने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याबरोबरच तो मुख्य भूमिकेतदेखील आहे. त्याच्याबरोबर दीप्ती लेले, स्मिता गोंदकर महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

दरम्यान, स्मिता गोंदकर आणि पुष्कर जोग हे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सामील झाले होते.