‘इलू इलू १९९८'(ILU ILU 1998)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मीरा जगन्नाथ, अंकिता लांडे, आरोह वेलणकर, वनिता खरात, कमलाकर सातपुते, निशांत भावसार असे अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. आता या कलाकारांच्या बरोबरीनेच एली अवराम(Elli Avrram) ही अभिनेत्री पहिल्यांदाच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ स्वीडिश असलेल्या या अभिनेत्रीने याआधी हिंदी चित्रपटात काम केले आहे. याबरोबरच ती लोकप्रिय हिंदी भाषेतील बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. एली अवराम बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
एली अवराम काय म्हणाली?
एली अवरामने नुकताच नवशक्तीबरोबर संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडचा एक किस्सा सांगितला आहे. एली अवरामने म्हटले की, माझा एक बॉयफ्रेंड होता, आमचं नातं तुटलं. त्याच्या एका वर्षानंतर तो भारतात आला आणि त्याने मला सरप्राइज दिलं. तो माझ्या दरवाज्याबाहेर होता आणि त्याला पाहून मला धक्का बसला होता. त्या मधल्या एका वर्षात आमचा काहीच संपर्क नव्हता. त्याने मला कसे शोधले असा मला प्रश्न पडला होता. कारण तो भारतात पहिल्यांदाच आला होता. त्याला वाटले की तो जे करतोय, ते सगळं रोमँटिक होईल. पण, तेव्हा मी आयुष्यात पुढे गेले होते. त्याला असे वाटले की, मी म्हणेन की तू माझ्यासाठी आला आहेस, मला आनंद झाला. आता पुन्हा आपण एकत्र येऊ, लग्न करू अशी कल्पना त्याने केली होती.
पुढे काय झाले हे सांगताना अभिनेत्रीने म्हटले की, पुढे आम्ही हे सगळं पोलिस ठाण्यामध्ये संपवलं. ते एकूणच सगळं क्लेशकारक होतं. आम्ही तिथे दोघे एकमेकांसमोर बसलो होतो. आमच्या भाषेत बोलत होतो. तिथे असणाऱ्या पोलिसांनी आम्हाला विचारलंदेखील की तुमचं नेमकं काय चाललं आहे. ते सगळं खूप फिल्मी होतं. एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील सीनसारखं सगळं घडत होतं. मी त्याला म्हणत होते की मला तुझ्याबरोबर राहायचं नाहीये. तो मला म्हणत होता की, पण मी तुझ्यावर प्रेम करतो. मला वाटलं की मला पाहिल्यानंतर तुला आनंद होईल. मी म्हटलं की नाही, हे सगळं खूप वेदनादायी आहे. त्यानंतर मी म्हटलं की आता मला जावं लागेल. शेवटी त्याने मला म्हटलं की एली आज जर तू गेलीस तर पुन्हा परत माझा चेहरा कधीच पाहणार नाहीस. तर मी रडत होते. मी शाल पांघरली होती. मी पुढे चालत गेल्यानंतर तो माझे नाव घेत ओरडत होता. ते सगळं खूप नाट्यमय होतं, असे म्हणत एलीने तिच्या खासगी आयुष्यातील प्रसंग सांगितला.
दरम्यान, ‘इलू इलू १९९८’ हा चित्रपट प्रेमावर आधारित असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. आता ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.