Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीपासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आज प्रत्येकजण एकमेकांना ‘आपला स्वातंत्र्यदिवस चिरायू होवो’ असे म्हणत शुभेच्छा देत आहे. मराठी कलाकारांनाही सोशल मीडियावर पोस्ट, फोटो शेअर करून भारतातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने “भारत माझा देश आहे…” ही शाळेतील प्रतिज्ञा सोशल मीडियावर शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री सई ताम्हणकरने पांढऱ्या शेडची साडी नेसून स्वातंत्र्यदिनानिमित्त खास फोटोशूट केले आहे. या फोटोला कॅप्शन देत “मला भारतीय नारी असल्याचा प्रचंड अभिमान आहे” असे सईने म्हटले आहे.
“विविध धर्म, भाषा, प्रांत यांना सामावून घेणाऱ्या तिरंग्याचा मला प्रचंड अभिमान आहे…भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा…माझा देश आणि भारतीय संविधान चिरायू होवो…वंदे मातरम्…जय हिंद जय महाराष्ट्र…” अशी पोस्ट शेअर करत हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुले यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“वन्दे नितरां भारतवसुधाम्। दिव्य हिमालय-गंगा-यमुना-सरयू-कृष्णशोभितसरसाम् ॥” असे लिहित अभिनेत्री पूजा सावंतने भारतीय ध्वजासह खास फोटो शेअर केला आहे.
“भारतमाता की जय…” म्हणत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लेक सना शिंदेचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या लूकमधील खास फोटो शेअर केला आहे.
तसेच तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी, माधुरी दीक्षित, गौरव मोरे यांसारख्या अनेक मराठमोळ्या कलाकारांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.