भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाचा शिल्पकार टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ठरला आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजी जोरावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांमध्ये ऑलआऊट झाला. यामध्ये एकट्या मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या तब्बल ७ विकेट्स काढल्या. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात मोहम्मद शमीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सामान्य लोकांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण मोहम्मद शमीचं कौतुक करत आहेत. ‘झिम्मा’ चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेने या भारतीय गोलंदाजासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमंतने ‘झिम्मा’ चित्रपटातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
हेमंतने ढोमेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निर्मिती सावंत “मला तर बाबा इतकी मजा आली…” असं बोलताना दिसत आहेत. निर्मिती सावंत म्हणजेच मोहम्मद शमी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इतर अभिनेत्री म्हणजे न्यूझीलंडचा संघ असं वर्णन दिग्दर्शकाने या व्हिडीओमध्ये केलं आहे. या व्हिडीओला हेमंतने “सेमी-final नाही, शमी-फायनल झाली! धुडूऽऽऽऽऽम!!!” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : “…म्हणून मी माझे चित्रपट बघत नाही”; ‘कॉफी विथ करण’मध्ये करीनाचा मोठा खुलासा, म्हणाली
दरम्यान, दिग्दर्शकाने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवून येत्या १९ नोव्हेंबरला भारतीय संघ अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. याशिवाय ‘झिम्मा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर याचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘झिम्मा २’ येत्या २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.