मराठीसह हिंदी चित्रपटात काम करत अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)ची ओळख आहे. अभिनेत्याने २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात अभिनेत्याला प्रमुख भूमिका मिळाली. सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. ज्यामध्ये ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘इरादा पक्का’, ‘खो खो’, ‘हुप्पा हुय्या’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शासन’, ‘रझाकार’, ‘शिकारी’, ‘सर्कस’, ‘नवरा माझा नवसाचा २’, अशा अनेक चित्रपटांत अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. सिद्धार्थ जाधव हा त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जातो. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अभिनेता आता त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत त्याने तो खरंच ४१ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे का, यावर खुलासा केला आहे.
२६ वर्षांनी…
अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकतीच अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला विचारण्यात आले की, कुठेतरी वाचनात आलं होतं की तू ४१ कोटींचा मालक आहेस. यावर अभिनेत्याने हसून उत्तर दिले. सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मी माझ्या पूर्ण कारकिर्दीत ४१ कोटी कोट्या केल्या असतील.” पुढे अभिनेता म्हणाला, “जे काही कमवलंय या २५ वर्षांत किंवा इतक्या वर्षांत ते ४१ कोटींच्या पलीकडचं आहे. आकड्यांमध्ये ती संपत्ती मलाही माहीत नाही, पण कुठेतरी स्थिर झालो आहे. जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा पप्पांच्या मित्राच्या भाड्याच्या घरात राहत होतो. शिवडीला झोपडपट्टीत राहत होतो, तेव्हा स्वप्न होतं की आई-वडिलांसाठी घर घ्यायचं; ते २६ वर्षांनी पूर्ण केलं.
“आई-वडिलांसाठी छानसं घर घेऊ शकलो. लालबाग शिवडीच्या परिसरात मोठा झालो, त्या परिसरात घर घ्यायचं माझं स्वप्न होतं की दादरला घर घ्यायचं. बेसिक गोष्टी ज्या जगण्यासाठी लागतात, त्या घेऊन स्वत:ला सेटल करू शकलो, त्यामुळे मला वाटतं की ४१ कोटींपेक्षा जास्त माझी कमाई आहे. माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहेच. ती मला १०० कोटींचा मालक असल्याची भावना करून देते. माझ्या आई-वडिलांना हक्काच्या घरात सेट करू शकलो, कारण झोपडपट्टीतून निघाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भाड्याच्या घरात ठेवलं, तेव्हा भाड्याच्या घरावर पप्पांची नेमप्लेट लावली होती. तेव्हा मला माहीत नव्हतं की भाड्याच्या घरावर भाडेकरूची नेमप्लेट लागत नाही. तेव्हा ते मालक म्हणाले होते, तसं होऊ शकत नाही. आता मी आई-वडिलांची नेमप्लेट लावली आहे. ही माझ्यासाठी मिळकत आहे.” पुढे तो ४१ कोटींचा मालक असल्याच्या माहितीवर तो म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे, ही बातमी खोटी आहे की कोटी आहे मला माहीत नाही; पण चांगली आहे, मला बरं वाटलं”, असे हसत मिश्कीलपणे अभिनेत्याने वक्तव्य केले.
सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भरत जाधवदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, अभिनेता सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या माध्यमातून तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या उत्साहाचे चाहते तसेच कलाकारांकडून नेहमी कौतुक होताना दिसते.