Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Marathi Actors Reaction : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. २२ एप्रिलला दुपारी पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी २.३० वाजता झाला. यावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. अभिनेता सौरभ गोखले पोस्ट शेअर करत लिहितो, “पूर्ण भिकेला लागला तरी तो देश सुधारणार नाही…घुसून मारा! #PahalgamTerroristAttack. सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण तुमच्या मुलांना जरूर द्या. परंतु, तुमच्या धर्मावर बोट ठेवून तुमच्यावर अत्याचार होत असेल तर, ते बोट छाटायची हिंमत, ताकद आणि धर्माभिमानही त्याच्यात जागृत करा! ही काळाची गरज आहे.”

अभिनेता सौरभ गोखलेची पोस्ट ( Jammu Kashmir Pahalgam Terror Attack )
सौरभ गोखलेची पोस्ट

तर, अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे. “काश्मीर येथील बातमी ऐकून धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. अशाप्रकारची हिंसा कधीच जिंकू शकत नाही. #काश्मीर #शांतता” असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरची पोस्ट ( Jammu Kashmir Pahalgam Terror Attack )

“जम्मू काश्मीर येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यात मुस्लीम नसलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं… नि:शब्द” अशी पोस्ट अभिनेता आरोह वेलणकरने शेअर केली आहे. तर, वैभव तत्त्ववादी, तेजश्री प्रधान अशा अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

आरोह वेलणकरची पोस्ट ( Pahalgam Terror Attack )

दरम्यान, या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार चालू आहेत. यातील काही लोक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.