Marathi Actor Jaywant Wadkar Daughter : मराठी नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या हरहुन्नरी अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून जयवंत वाडकरांना ओळखलं जातं. १९८८ मध्ये त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली होती. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सध्या जयवंत वाडकर त्यांच्या लेकीमुळे चर्चेत आहेत.
आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने सुद्धा मनोरंजनविश्वात पदार्पण केलं आहे. जयवंत वाडकरांच्या लेकीचं नाव स्वामिनी असं आहे. स्वामिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. ‘अशी ही आशिकी’, ‘बाबा’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये तिने काम केलेलं आहे. आता स्वामिनीने आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरु केला आहे. याबद्दल जयवंत वाडकरांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच लाडक्या लेकीचं कौतुक सुद्धा केलं आहे.
स्वामिनी वाडकर ‘HC London’ या कपड्यांच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. याबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे. यामध्ये “स्वामिनी आणि ‘HC लंडन’ एकत्रितपणे फॅशन उद्योगात एक नवीन बेंचमार्क प्रस्थापित करतील” असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच अभिनेत्रीच्या मित्रमंडळींनी, याशिवाय सिनेविश्वातील कलाकारांनी देखील ब्रँड अँबॅसेडर झाल्याबद्दल स्वामिनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक
अभिनेता गौरव मोरेने या नव्या प्रवासासाठी स्वामिनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अभिनंदन बच्ची’ असं कॅप्शन देत अभिनेत्याने तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या ‘एफ यू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर ती सचिन पिळगांवकरांच्या ‘अशी ही आशिकी’ चित्रपटात झळकली होती. तसेच यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाबा’ या लघुपटात बापलेकीची जोडी पाहायला मिळाली होती. स्वामिनीने यामध्ये जयवंत वाडकरांबरोबर ( Jaywant Wadkar ) स्क्रीन शेअर केली होती.